
खानापूर : खानापूर तहसील कार्यालयातील भू-दाखले विभागातील सहाय्यक संचालकांच्या कार्यालयातील एका सर्वेअरवर छापा टाकत त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील कुटिनो नगर क्षेत्रातील मन्सापूर गावचे रहिवासी सदाशिव कांबळे यांच्याकडून पी.टी. शीट तयार करून देण्यासाठी सर्वेअर विनोद संबन्नी यांनी रु. ४५०० लाच मागितली होती. या प्रकाराविरोधात सदाशिव कांबळे यांनी बेळगाव लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
तक्रार मिळताच लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसपी भरत रेड्डी यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने कारवाई करत खानापूरमध्ये कार्यरत असलेल्या सर्वेअर विनोद संबन्नी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात यश मिळवले.
ही कारवाई करताना लोकायुक्त अधिकारी संगमेश होसामनी, रवीकुमार धर्मच्ची व अन्य लोकायुक्त पोलीस अधिकारी उपस्थित होते. या प्रकारामुळे खानापूरमधील शासकीय यंत्रणेत असलेल्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून, लोकायुक्तांची ही धडक कारवाई हा भ्रष्टाचार्यांसाठी इशाऱ्याची घंटा ठरत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta