
दोन दिवसात रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात होणार.
खानापूर : नंदगड-नागरगाळी मार्गावरील हलशी ते मेरडा मार्गावर मोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे. खानापूर तालुक्याचे आमदार व पीडब्ल्यूडी खात्याचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या घरासमोर व पीडब्ल्यूडी खात्याच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व हलगा ग्रामपंचायतीचे सदस्य रणजीत पाटील यांनी दिला होता. याबाबत सोशल मीडियासह अनेक वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसारित झाली होती. याची दखल पीडब्ल्यूडी खात्याचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर संजय गस्ती यांनी घेतली व आज हलगा – मेरडा या ठिकाणी रणजीत पाटील यांच्यासह भेट देऊन रस्त्याची पाहणी केली व येत्या दोन दिवसात रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरूवात करण्याची ग्वाही दिली.
रस्त्याची पाहणी केल्यानंतर संजय गस्ती यांनी सदर नादुरुस्त रस्त्याच्या कंत्राटदाराला फोनवरून रस्त्याची दुरुस्ती ताबडतोब करण्याचा आदेश दिला. यावेळी रणजीत पाटील यांनी सदर कंत्राटदाराला दोन दिवसात काम सुरू करा अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असा इशारा दिला.
Belgaum Varta Belgaum Varta