
खानापूर : खानापूर येथे नव्याने बांधलेल्या इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन उद्या शनिवार २१ जून रोजी दुपारी १२:०० वाजता होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि खानापूर नगर पंचायतीच्या सहकार्याने शिव छत्रपती चौक येथील रिक्षा स्टँडशेजारी हे कॅन्टीन उभारण्यात आले आहे.
कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते या कॅन्टीनचे उद्घाटन होईल. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी कर्नाटक सरकारच्या महिला आणि बाल विकास, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, नागरी प्रशासन आणि हज मंत्री रहीम खान आणि नगर विकास आणि नगर नियोजन मंत्री सुरेश बी. एस. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्यासह विविध विभागांचे अनेक मंत्री, जिल्ह्यातील आमदार आणि खासदारही याप्रसंगी उपस्थित राहतील.
माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातून खानापूरला कामासाठी येणाऱ्या लोकांना कमी दरात नाश्ता आणि जेवण मिळावे, यासाठी या इंदिरा कॅन्टीनला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. आता या कॅन्टीनचा लाभ तालुक्यातील जनतेला मिळेल. या कॅन्टीनमध्ये सकाळचा नाश्ता १० रुपयांना आणि दुपारचे जेवण २० रुपयांना उपलब्ध असेल. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना आणि गरीब नागरिकांना यामुळे चांगल्या सुविधा मिळतील.
Belgaum Varta Belgaum Varta