खानापूर : खानापूरमध्ये सलग दोन ठिकाणी घडलेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत दोघा चोरट्यांना अटक केली. चोरीस गेलेले सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
खानापूर येथील मराठा मंडळ डिग्री कॉलेजसमोर राहणाऱ्या रेखा क्षीरसागर यांच्या घरी कोणीही नसताना कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. या वेळी त्यांनी ६०.०५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. त्याचप्रमाणे, शिवाजीनगर येथील रहिवासी राचण्णा किणगी यांच्या घरीही कोणी नसताना २५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले गेले. या दोन्ही घटनांच्या तक्रारी खानापूर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्या. या प्रकरणाच्या अनुषंगाने खानापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रुती एस.एच., अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामगोंड बसर्गी, आणि बैलहोंगल उपविभागीय अधिकारी डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूरचे पोलीस निरीक्षक लालसाहेब गौंडी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकाने संशयित आरोपींचा शोध घेऊन दीपक मातंगी आणि शिवनागय्या उमचगिमठ यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. “दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. चोरीप्रकरणात आवश्यक पुरावे गोळा करून तपास सुरू आहे,” अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.या कार्यवाहीमध्ये पीएसआय मलकनगौड बिरादार, अतिरिक्त पीएसआय निरंजन, हवालदार जगदीश काद्रोळी, एस.व्ही. कमकेरी, बी.जी. यलिगार तसेच विनोद कठ्ठण्णावर आणि सचिन पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Belgaum Varta Belgaum Varta