खानापूर : प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या करून स्वतःवरही चाकूने वार करून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील बीडी गावात घडली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत महिला रेश्मा तिरवीर (वय 29, रा. बीडी) व आरोपी प्रियकर आनंद सुतार हे दोघेही एकाच गावातील असून त्यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. काही दिवसांपूर्वी रेश्माच्या पतीला या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर घरात वारंवार वाद सुरू झाले. याबाबत रेश्माच्या पतीने नंदगड पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. पोलिसांनी आनंदला समज देऊन पुढे रेश्माच्या सहवासात न जाण्याची ताकीद देऊन सोडून दिले होते. यामुळे अत्यवस्थ झालेल्या आनंदने गुरुवारी रात्री रेश्माच्या घरी जाऊन तिला सलग नऊ वेळा चाकूने वार केले. यात ती जागीच ठार झाली. त्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वतःवर वार घेतला. त्याला बेळगाव रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
घटनास्थळी बैलहोंगलचे डीवायएसपी वीरेश हिरेमठ यांनी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. नंदगड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
मृत रेश्माला दोन मुले आहेत, तर आनंदलाही तीन मुले असून त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे.

Belgaum Varta Belgaum Varta