
खानापूर : खानापूर तालुक्यातील प्रत्येक सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचे चांगले कार्य महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास निश्चित मदत होईल असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून खानापूर तालुक्यातील सरकारी मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण करण्याचा उपक्रम युवा समितीतर्फे हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात गुरुवारी नागुर्डा, निलावडे व मनतुर्गा भागातील मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याची वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सरचिटणीस दळवी यांनी तालुक्यातील मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असून युवा समितीतर्फे गेल्या आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जात आहे. या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असून शिक्षकानी देखील आपल्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

समितीचे युवा नेते अभिजीत सरदेसाई यांनी खानापूर तालुक्यात दुर्गम भागात अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी शिक्षण खात्यातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मराठी भाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आज अनेक ठिकाणी मोठी मजल मारली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देखील मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी अशाच प्रकारे चांगली प्रगती करदी याचा विश्वास आहे. युवा समितीने पुढील काळात देखील अशाच प्रकारे आपले कार्य सुरू ठेवावे त्याला सर्व प्रकारचे सहकार्य खानापूर तालुका समितीतर्फे केले जाईल असे मत व्यक्त केले.
मिलिंद देसाई यांनी युवा समितीतर्फे शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून खानापूर तालुक्यातील शंभरहून अधिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे अशी माहिती दिली. सुनील पाटील, संदेश कोडचवाडकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नागुर्डा, नागुर्डावाडी, मोदेकोप, दारोळी, कान्सुली, कोंकनवाडा, निलावडे, अंबोली, बांदेकर वाडा, मुघवडे, शेडेगाळी, अल्लोळी, असोगा आदी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी नागुर्डा शाळेचे मुख्याध्यापक आर के मादार, व्ही के बापसेट, नागुर्डा शाळेच्या मुख्याध्यापक जयश्री गुंजीकर, एम आर पाटील, एस आर मनेरीकर, कांसुली शाळेचे मुख्याध्यापक आर एम लोहार, शंकर किणेकर, एम के पाटील, डी जी सूर्यवंशी, ए ए कुरने आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta