

खानापूर : खानापूर तालुक्यातील इटगी गावातील ४२ शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणविषयक समस्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी अखेर सोडवली आहे. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच इटगी गावचे ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि ग्रामस्थांनी शाळेच्या मागणीसाठी गाव बंद ठेवून आंदोलन केले होते. यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन समर्थन दिले होते. त्यांनी ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना सार्वजनिकरित्या आश्वासन दिले होते की, कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यानुसार, त्यांनी आंदोलनकर्त्यांसमोरच शिक्षणमंत्र्यांना फोन करून निवेदन केले होते. त्यानंतरही त्यांनी विभागाच्या प्रधान सचिवांसोबत दोन-तीन वेळा बोलून सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेरीस आज त्यांना यश मिळाले. सरकारने इटगी शाळेला मंजुरी देणारा आदेश जारी केला असून, इटगी येथील ४२ विद्यार्थ्यांची समस्या कायमची संपुष्टात आणली आहे. एकंदरीत, माजी आमदार असूनही आपल्या तालुक्यातील मुलींच्या शैक्षणिक सुविधेला धक्का लागणार नाही याची काळजी घेत त्यांनी शासकीय स्तरावर प्रयत्न केले आणि इटगी ग्रामस्थांना एक मोठी शैक्षणिक भेट दिली. माजी आमदार व एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्या या कार्याबद्दल शिक्षणप्रेमी आणि तालुकावासीय कौतुक व्यक्त करत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta