
खानापूर : कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग (KSPL) हंगाम २ मधील दहाव्या दिवशी डॉ. अंजली निंबाळकर फाउंडेशन पुरस्कृत “राजा शिवाजी बेळगाव” संघाने सलग दुसरा विजय मिळवत सुपर १६ फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.
काल खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात “राजा शिवाजी बेळगाव”ने आयकोस धारवाडच्या ८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत फक्त ५.३ षटकांत ८३/१ अशी दमदार धावसंख्या उभारली. संघाने तब्बल ९ गडी राखून विजय मिळवत आपली धडाकेबाज फॉर्म कायम राखली.
या सामन्यात रब्बानी दफेदारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी २ षटकांत १३ धावा देत १ बळी घेतला तसेच केवळ ११ चेंडूत ३६ धावा ठोकून संघाला झंझावाती विजय मिळवून दिला.
आज खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात “राजा शिवाजी बेळगाव”ने पुन्हा एकदा आपली विजयी लय कायम ठेवत म्हैसूर महाराजा संघाचा धुव्वा उडवला. फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही आघाड्यांवर बेळगावचे वर्चस्व दिसून आले.
या सामन्यात संतोष सुलगे पाटील यांना सामनावीर म्हणून तर प्रसाद नाकाडी यांना सुपर स्ट्राईकर पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुढील सामना दोन दिवसांनी यादगीर संघाविरुद्ध रंगणार असून “राजा शिवाजी बेळगाव”चा सलग तिसरा विजय निश्चित करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta