
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील निवृत्त सैनिकावर पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ वायरल होताच तालुक्यात एका संतापाची लाट उसळली. हेल्मेट नसल्याचे क्षुल्लक कारणावरून एका निवृत्त सैनिकाला चार ते पाच पोलिसांनी मारहाण करत जबरदस्तीने ओढत पोलीस ठाण्यात नेल्याची घटना नंदगड येथे नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांसोबतच निवृत्त सैनिक संघटनेत देखील एकच संतापाची लाट उसळली आहे. नंदगड पोलिसांच्या या कृत्याचा माजी सैनिक संघटनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आज नंदगड पोलीस स्थानकाला घेराव घातला. बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच नंदगडसह खानापूर तालुक्यातील शेकडो माजी सैनिकांनी मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. वयोवृद्ध निवृत्त सैनिकाला केलेली मारहाण म्हणजे हा समस्त माजी सैनिकांचा अपमान आहे. यासाठी जबाबदार पोलिसांवर तात्काळ निलंबनासह कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम मागणी निवृत्त सैनिक संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे केली व भविष्यात कोणत्याही माजी सैनिकांना अशाप्रकारे हात लावल्यास संघटना कदापि शांत बसणार नाही असा कठोर इशारा देखील यावेळी देण्यात आला.
समाज माध्यमावर वायरल झालेल्या व्हिडिओमुळे हा मुद्दा संपूर्ण राज्यभर गाजला असून कर्नाटकातील 26 जिल्ह्यात या घटनेचा निषेध नोंदवण्याची तयारी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली व पोलिसांवर तात्काळ कारवाई न झाल्यास व्यापक आंदोलन उभारले जाईल असे देखील ते यावेळी म्हणाले. घटनेने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने या संदर्भात निपक्ष चौकशी व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. नंदगड पोलीस स्थानकाचे पीआय व पीएसआय यांनी उपस्थित राहून माजी सैनिक संघटनेचे निवेदन स्वीकारले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta