Friday , December 12 2025
Breaking News

सन्मान शिक्षणाचा, गौरव नेतृत्वाचा: अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यादव यांच्या राजस्तरीय पुरस्काराचा गौरव

Spread the love

 

खानापूर : मराठा मंडळ बेळगाव संचलित, खानापूर तालुक्यातील विविध शाळा, कॉलेज , हितचिंतक व संस्थेच्या वतीने सन्माननीय अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचा खानापूरात भव्य सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ राजश्रीताई नागराजू यादव यांच्या धवल शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने 1 नोव्हेंबरला 2025 सालचा मानाचा शैक्षणिक राज्योत्सव पुरस्कार बहाल करून त्यांचा यथोचित सन्मान बेंगळोर येथे करण्यात आला होता.
याचेच औचित्य साधून खानापूर तालुक्यातील मराठा मंडळ संस्थेच्या विविध शाळा, कॉलेजच्या, व हितचिंतक याच्या संयुक्त विद्यमाने नुकताच भव्य असा सत्कार सोहळा संपन्न झाला.
प्रारंभी डाॅक्टर राजश्रीताई नागराजू यादव यांचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कमिटीच्या वतीने श्री प्रकाश चव्हाण आणि पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ पानवीडा देऊन अभिनंदन केले. त्यानंतर डॉ राजश्रीताई नागराजू यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. झांजा पथक, ढोल ताशांच्या गजरात शेकडो कलश धारी विद्यार्थींनीच्या साक्षीने, ध्वज नाच आणि निनाद करीत ही गौरव फेरी बेळगाव खानापूर रस्त्यावरून पुढे निघाली जवळ जवळ दोन तास खानापूर करांनी टक्क लावून हा स्फुरणीय जल्लोष पाहीला शेवटी ही गौरव फेरी मराठा मंडळ संचलित श्री सिद्धिविनायक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आवारात आली जिथे मुख्य सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आवारात येताच मराठा मंडळाच्या एन सी सी कॅडेटनी या फेरीचा ताबा घेतला व शाही मानवंदना देत शिस्तबद्ध अशा वातावरणात डोळ्याचे पारणे फेडणारा रायफल सॅलूट दिला….

रस्त्याच्या दुतर्फा डॉ. राजश्रीताई नागराजू यादव यांच्या शैक्षणिक कार्याचे गुणगान करणारे बोलके फलक घेऊन थांबलेले विद्यार्थी गौरव मार्गाची मंगलमय शोभा वाढवित होते….
व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे स्वागत ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीताने केले. व ईशस्तवन ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सादर केले. सत्कार मूर्ती मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजूच्या हस्ते भुवनेश्वरी मातेचे पूजन व मराठा मंडळ संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री. दिनकरराव ओऊळकर यांच्या हस्ते तत्कालीन अध्यक्ष शिक्षण महर्षी कै. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नाडगीत सादर केले.
व्यासपीठावरील उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. परशराम रामचंद्र गुरव, सत्कारमूर्ती मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू मॅडम, मराठा मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष श्री. दिनकरराव ओऊळकर, कार्यकारी समिती सदस्य श्री. नागेशराव झंगरुचे, श्री शिवाजीराव पाटील, श्री. रामचंद्रराव मोदगेकर, श्री. नागेशराव तरळे, श्री. विनायकराव घसारी, मराठा मंडळ संस्थेचे व्यवस्थापक व कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सत्कारमूर्तींचा परिचय प्राचार्या श्रीमती जयश्री अंची यांनी करून दिला व म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
खानापूर तालुक्यातील मराठा मंडळ संस्थेच्या विविध शैक्षणिक विद्यालये यांच्यावतीने सत्कारमूर्ती डॉ. राजश्री नागराजू मॅडम यांचा सत्कार श्रीमान परशराम गुरव, श्रीमान शिवाजीराव पाटील, सर्व शाळांचे प्राचार्य, प्राचार्या मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका व शाळात निवडून आलेले विविध शाळांचे विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते गुलाबी शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची देखणी अश्वारूढ मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला. त्या नंतर सिध्दीविनायक शाळेचे बस चालक, मराठा मंडळ तालुका क्रीडा शिक्षक, निवृत्त शिक्षक आणि हितचिंतक यांनीही सत्कार केला.
सत्कारला उत्तर देताना डॉ. राजश्री नागराजू यादव म्हणाल्या….. “हा सत्कार केवळ माझा नसून संस्थेतील प्रत्येक सदस्यांचा असून हा पुरस्कार मी विद्यार्थांना व समस्त शिक्षकांना अर्पण केला आहे. खानापूरमधील सर्व भाषिकांना सोबत घेऊन तसेच कार्यकारी समिती सदस्यांच्या सहकार्यामुळेच मराठा मंडळ खेडोपाड्यात शिक्षणाचा लख्ख प्रकाश पाडू शकले. मला मिळालेला सन्मान म्हणजे समस्त मराठा मंडळाच्या प्रत्येक व्यक्तीचा, विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि समस्त शिक्षकवृंदाचा गौरव आहे. आता या पुरस्कारांने आम्हा सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे, हा पुरस्कार शोभेचे साधन नसून पुन्हा शिक्षण क्षेत्रात नव्या दमाने स्वैर भरारी मारण्याची प्रेरणेची साधना आहे…… आणि ही शक्ती घेऊन आपण सारे शिक्षणाची निस्सीम भक्ती करूया, मी आपल्या सोबत शिक्षणाची अजून नवी क्षितिजे शोधण्यास सज्ज आहे, आपण ही शिध्द व्हावं” असे भावनिक आवाहन करीत त्यांनी देश प्रेमाचा जागर करीत “जय हिंद”चा नारा देत आपल्या शब्दांना विराम दिला.
अध्यक्षीय समारोप भाषणात मराठा मंडळ संस्थेचे उपकार्यकारी विश्वस्त श्रीमान रामचंद्र मोदगेकर यांनी संस्थेच्या कार्य प्रणालीचा सुंदर आढावा घेतला आणि खानापूर वाशीयांचे मराठा मंडळ शिक्षण संस्थेसाठी असलेले योगदान अधोरेखित करीत मनस्वी धन्यवाद मानले.
खानापूर तालुक्यातील मराठा मंडळ संस्थेच्या विविध शैक्षणिक विद्यालये,.मराठा मंडळ कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय, मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालय, मराठी मंडळ ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूल, मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल, मराठा मंडळ श्री सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, मराठा मंडळ करंबळ हायस्कूल मराठा मंडळ कापोली हायस्कूल, मराठा मंडळ बेकवाड हायस्कूल, मराठा मंडळ कुपटगिरी हायस्कूल, मराठा मंडळ कान्सुली हायस्कूल आदी शाळांचे प्राचार्य, प्राचार्या मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका विद्यार्थी, विद्यार्थिनी व मराठा मंडळ कार्यालयीन व्यवस्थापक सेक्रेटरी श्री. भाऊराव पाटील, श्री. एल व्ही मण्णूरकर, श्री. प्रमोद जाधव, श्री. उदय गुरव या प्रसंगी हा मोहक सोहळ्यात उपस्थित होते, शिवाय या सोहळ्यात सहभागी असलेल्या संचालक मंडळाने व महिला शिक्षकांनी डोकीवर पांढऱ्या रंगाचे फेटे परिधान केले होते तर पुरूष शिक्षकांनी महिलांच्या अभिमान स्थानी असणाऱ्या गुलाबी रंगाचे फेटे परिधान केले होते त्यामुळे या समारंभाला विलोभनीय दृष्ट्य प्राप्त झाले होते…..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सिद्धिविनायक शाळेच्या प्राचार्या श्रीमती वैभवी वंजारे, मराठा मंडळ हायर सेंकडरीचे मुख्याध्यापक श्री के व्ही कुलकर्णी, म मं प पू काॅलेजचे प्रा. एन एम सनदी यांनी केले .शेवटी आभार प्रदर्शन कापोली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पी टी मेलगे यांनी केले….. देश प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या या सुंदर अशा कार्यक्रमाचा शेवट सामुहिक वंदे मातरमने गीताने झाला.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *