


बेळगाव : नंदीहळी- राजहंसगड रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे राजहंसगड परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजहंसगड मार्गावरून गर्लगुंजी, नंदीहळी आदी भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून वाहन चालक मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. सध्या शेतात भात पिकांची मळणी सुरू आहे त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात वास्तव्यास असतात त्याचप्रमाणे सध्या गर्लगुंजी भागात विटा काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे वीट मजूर शेतात झोपड्या बांधून वास्तव्यास आले आहेत. अशावेळी बिबट्या दिसल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गर्लगुंजी भागातील कनवी या ठिकाणी घनदाट जंगल आहे. त्यामुळे या भागात हत्ती, बिबटे अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. बिबट्या दृष्टीस पडल्याची माहिती वनविभागाला मिळतात तात्काळ खानापूर वनविभाग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर गर्लगुंजी भागात वीट उत्पादनासाठी आलेल्या वीट कामगारांना आपापल्या झोपडीसमोर आणि मागे शेकोटी पेटवून ठेवण्याचा सल्ला दिला, त्याचप्रमाणे वीट कामगारांनी आपल्या पशुधनांची योग्य ती काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी वेगळी झोपडी बांधून त्या ठिकाणी आपापल्या जनावरांना ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच लहान मुले किंवा महिलांनी निर्जनस्थळी एकटे जाऊ नये. पोल्ट्री मालकांनी देखील पोल्ट्री मधील वेस्टेज जवळपास टाकू नये कारण बिबट्या त्याच्या वाशेने त्या ठिकाणी येऊ शकतो त्याचप्रमाणे दुचाकीवरून प्रवास करताना नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे आणि बिबट्या नजरेस पडल्यास त्वरित खानापूर रेंज ऑफिस किंवा गर्लगुंजी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
वनविभाग अधिकाऱ्यांसह गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील, सुनिल पाटील यांच्यासह गावातील जागरूक तरुण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta