

खानापूर : मराठी शाळांच्या विकासासाठी आणि सामान्य वर्गातून शिक्षण घेण्यासाठी पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी उद्योजकांनी शाळा दत्तक घ्याव्यात आणि सरकारी मराठी शाळांच्या विकासाला हातभार लावावा, असे प्रतिपादक खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
बेळगाव येथील युवा उद्योजक महेश बिर्जे यांनी आपल्या आई-वडिलांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजीनगर खानापूर येथील सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स जॅकेटचे वितरण केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या दळवी म्हणाले, बिर्जे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना मदत करून सर्वांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी गरीब कुटुंबातून येतात त्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केल्यास त्यांना शिक्षण घेताना मदत होणार आहे. सरकारी शाळांमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच उद्योजक म्हणून काम करत असताना सामाजिक बांधिलकी देखील जपत आहेत मात्र येणाऱ्या काळात शाळांच्या विकासासाठी उद्योजकांनी शाळा दत्तक घेतल्यास सरकारी मराठी शाळांना मदत होईल असे मत व्यक्त केले.
ऍड. अभिजीत सरदेसाई यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन बिर्जे यांच्यासारखे नवउद्योजक निर्माण होत आहेत आणि ते शाळांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत यापासून प्रेरणा घेण्यासाठी आहे. येत्या काळात देखील अशाच प्रकारचे उपक्रम राबवून सरकारी मराठी शाळा हातभार लावावा असे मत व्यक्त केले. हलगा ग्राम पंचायतीचे सदस्य रणजीत पाटील, खानापूर तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले.
मिलिंद देसाई यांनी प्रास्ताविक करताना अनाथ आणि गरजू विद्यार्थांना मदत करण्यासाठी उद्योजक बिर्जे यांनी सातत्याने अनेकांना मदत केली आहे. युवा समितीतर्फे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करीत असताना अनेक प्रकारच्या अडचणी दिसून येतात त्यामुळे त्या शाळांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे असे सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र रणदिवे यांनी स्वागत केले, सामाजिक कार्यकर्ते सतीश कुगजी यांनी आभार मानले. यावेळी जयदीप भोसले, शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य गंगाराम बरगावकर, सह शिक्षक लक्ष्मण सूनगार, स्मिता कारेकर, संदीप घाडी, कृष्णा सुतार, पुंडलिक पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta