
खानापूर : खानापूर येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर निवड मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
डॉ. नाडगौडा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कर्नाटक गव्हर्नमेंट रिकनाईज्ड नेटबॉल असोसिएशन, दावणगिरी यांच्या वतीने आयोजित अंडर 19 वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर येथून मुलांचा व मुलींचा असे दोन संघ दिनांक 7 व 8 फेब्रुवारी रोजी सहभागी झाले होते.

या राज्यस्तरीय स्पर्धेत मुलांच्या संघातून राज्यातील 13 विविध जिल्ह्यांचे संघ तर मुलींच्या संघातून 9 जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत समर्थ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत उत्कृष्ट खेळ सादर केला.
या स्पर्धेत मुलांच्या संघातून 12 पैकी तीन खेळाडूंची, तसेच मुलींच्या संघातून 12 पैकी तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील नेटबॉल स्पर्धा येणाऱ्या 23 मार्च रोजी बेंगळुरू येथे होणार आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण हलगेकर यांचे मार्गदर्शन व अथक परिश्रम मोलाचे ठरले. तसेच शाळेच्या प्रशासन विभागातील दिव्या नाडगौडा यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. शाळेचे संचालक डॉ. नाडगौडा हे सदैव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असून त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे पदाधिकारी, शिक्षकवर्ग, पालक तसेच हितचिंतक रामचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta