Tuesday , March 3 2026
Breaking News

मौजे खैरवाडच्या मातीतून जागतिक नेतृत्वापर्यंतची थक्क करणारी झेप……!

Spread the love

 

खानापूर : नंदगड शेजारील खैरवाड या छोट्याशा खेड्यात जन्मलेला एक जिद्दी विद्यार्थी आज जागतिक उद्योगविश्वात मानाचे स्थान मिळवतो, ही संपूर्ण खानापूर तालुक्यासाठी अभिमानाची बातमी आहे. परशराम कोलेकर यांची Stellantis या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये हेड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग… इंडिया अ‍ॅण्ड पॅसिफिक या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर नुकतीच नियुक्ती जाहीर झाली आहे. ही केवळ वैयक्तिक कामगिरी नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.
श्री परशराम कोलेकर यांचे प्राथमिक शिक्षण खैरवाड येथील मराठी माध्यमाच्या सरकारी शाळेत झाले. वडील निवृत्त तलाठी. घरात शिस्त, प्रामाणिकपणा आणि कष्टाचे संस्कार. लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य, सुंदर आणि वळणदार हस्ताक्षर, तसेच वाचनाची विलक्षण आवड यामुळे ते शिक्षकांच्या विशेष लक्षात राहायचे. त्यांच्या वहीतील अक्षर म्हणजे जणू मोत्यांची माळच.
माध्यमिक शिक्षण द. म. शि. च्या नंदगड हायस्कूलमध्ये पूर्ण करताना त्यांनी केवळ अभ्यासच केला नाही, तर वाचनाचे प्रचंड वेड जोपासले. विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्रग्रंथ, वर्तमानपत्रे – जे मिळेल ते वाचायचे. ज्ञानाची ही भूकच त्यांच्या आयुष्याची खरी ताकद ठरली.
कारवार येथे डिप्लोमा इन मेकॅनिकल पूर्ण करताना त्यांनी अनेक अडचणींवर मात केली. आर्थिक मर्यादा होत्या; पण जिद्द अधिक मोठी होती. पुढे गोव्यातील फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी करत त्यांनी उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यानंतर पुण्यातील Tata Group मध्ये कार्यरत होत त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, अचूकता आणि कर्तृत्वाने वरिष्ठांना प्रभावित केले.
त्यांची गुणवत्ता ओळखून कंपनीने त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी Birla Institute of Technology and Science, Pilani येथे उच्च शिक्षण पूर्ण केले आणि तेही सुवर्णपदकासह. हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला.
काही वर्षांच्या उत्कृष्ट सेवेनंतर त्यांनी मलेशियामध्ये कार्यरत राहून कंपनीच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला. व्यवस्थापन कौशल्य, तांत्रिक प्रावीण्य आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर त्यांनी उद्योगक्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. आज त्यांची हेड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग – इंडिया अ‍ॅण्ड पॅसिफिक या पदावर निवड होणे म्हणजे त्यांच्या खडतर मेहनतीचा आणि सातत्यपूर्ण उत्कृष्टतेचा गौरव आहे.
खेड्यातील मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन जागतिक स्तरावर नेतृत्व करणे, ही खानापूर तालुक्याची शान आहे. परशराम कोलेकर यांचे यश हे सिद्ध करते की परिस्थिती नव्हे, तर जिद्द माणसाला मोठं बनवते. सुंदर हस्ताक्षर, अफाट वाचन, शिस्तबद्ध जीवन आणि अथक परिश्रम या गुणांवर उभा राहिलेला हा यशस्वी प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
खैरवाड ते जागतिक व्यासपीठ हा प्रवास खरंच अभिमानाचा आहे. खानापूर तालुक्याच्या या सुपुत्रास मनःपूर्वक शुभेच्छा.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *