
खानापूर : अखंड हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (दि. 19 फेब्रुवारी 2026) आरोग्य भारती, खानापूर शाखेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल येथे पार पडली. सामाजिक बांधिलकी जपत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवजयंतीच्या प्रेरणेतून आयोजित या सभेत रक्तदान, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांसाठी नागरिक शिष्टाचार व आरोग्यदायी जीवनशैली मार्गदर्शन, योग प्रशिक्षण, नशामुक्ती अभियान आदी उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

सभेत खालीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली
अध्यक्ष : डॉ. डी. ई. नाडगौडा
उपाध्यक्ष : डॉ. सुदर्शन सुळकर
महिला घटक प्रमुख : डॉ. परिणीती देसाई
कार्यकारिणी सदस्य : डॉ. राधाकृष्ण हेरवाडकर (दंतवैद्य), सदानंद कपिलेश्वरी, अमोल शाहापूरकर, रमेश जैन व पाटील
नवीन पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
ध्येय-धोरणांची मांडणी…
आरोग्य भारतीच्या कर्नाटक उत्तर प्रांताचे उपाध्यक्ष वासुदेव इनामदार यांनी नव्या कार्यकारिणीचे स्वागत करत संस्थेची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती स्पष्ट केली. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यविषयक जनजागृती पोहोचविण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित केली.
अध्यक्षांचे आश्वासन….
अध्यक्षपद स्वीकारताना डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी खानापूर परिसरात अधिक व्यापक आणि परिणामकारक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. “आरोग्य हीच खरी संपत्ती” या ध्येयाने काम करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संकल्प त्यांनी केला.
कार्यक्रमाची सुरुवात ओंकार व दीपप्रज्वलनाने झाली. लक्ष्मण शेट्टी यांनी आभार प्रदर्शन केले, तर शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. शिवजयंतीच्या पावन दिवशी आरोग्य भारतीच्या नव्या कार्यकारिणीने समाजहितासाठी कार्य करण्याचा दृढनिश्चय व्यक्त केल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta