
खानापूर : खानापूर शहरात रस्त्याचे काम सुरू आहे परंतु अतिक्रमणे तसेच कोर्ट कचेरीचे वाद यामुळे रस्ता निर्मितीत अडचणी येत आहेत. त्याचेच परिणाम छोट्या व्यापारी वर्गाला आणि जनतेला सहन करावे लागत आहेत.
पुढील 25 ते 30 वर्षांचा विचार करत खानापूर शहरात भव्य रस्ते होणे ही काळाची गरज आहे त्यामुळे ज्या ज्या गाळेधारकांनी अतिक्रमण केली आहेत त्या गाळेधारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवून देणे गरजेचे आहे. सदर रस्ता मोठा झाल्यास भविष्यात ट्रॅफिक समस्या सुटण्यास मदत होऊ शकते तसेच शहरात पार्किंगला योग्यरितीने जागा उपलब्ध होऊ शकते त्यामुळे सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन अतिक्रमण हटवून रस्ता करण्यास प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कठोर भूमिका घेत वेळ काढूपणा न करता नकाशाप्रमाणे रस्ता करणे ही काळाची गरज आहे. परंतु खानापूरच्या लोकप्रतिनिधींकडून याबाबत असमर्थता दाखवली जात आहे ही बाब खेदजनक आहे. खानापूर ब्लॉक काँग्रेस नेहमीच व्यापारी आणि जनतेच्या सुखदुःखात त्यांच्यासोबत आहे. मात्र भविष्याचा आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने देखील सकारात्मक आहे. रस्ता निर्मितीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना त्यांचा योग्य मोबदला देखील अद्याप मिळालेला नाही. तसेच शहरांतर्गत रस्त्याची कामे म्हणजे खेळखंडोबा चालू आहे त्यामुळे विद्यमान आमदार आणि खासदार आणि जातीने लक्ष घालून या समस्या सोडविल्या पाहिजे हेस्कॉम पासून रुमेवाडी क्रॉस पर्यंतचा रस्ता खणून अर्धवट स्थितीत सोडून दिल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर रस्ता निर्मिती करत असताना नियोजनाचा अभाव असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा रस्ता करत असताना एका बाजूने खणून पूर्ण करून नंतर दुसरी बाजू हातात घेतली असती तर नागरिकांना आणि व्यापारी बांधवांना मनस्ताप सहन करावा लागला नसता. सदर रस्ता बंद असल्यामुळे या भागातील व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील नेतृत्वाने विकास कामे राबवीत असताना दूरदृष्टी ठेवणे गरजेचे आहे, असे मत खानापूर ब्लॉक काँग्रेसने व्यक्त केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta