बेळगांव :खानापूर तालुक्यातील सर्वेक्षण क्रमांक 30, 38, 40 आणि 45 या जमिनीच्या मालकी व ताब्याबाबतचा वाद पुन्हा पेटला असून अतिक्रमणाच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कवळेमठाचे 77 वे मठाधीश श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी यांनी सदर जमीन मठाच्या मालकीची असताना त्यामध्ये अतिक्रमण झाल्याचा आरोप केला असून न्यायालय व प्रशासनाकडे त्या अतिक्रमणाविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
खानापूर येथील कवळेमठाच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणाबाबत खानापूर येथे काल मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सदर प्रकरणाची सविस्तर माहिती देण्याबरोबरच गंभीर आरोप करताना स्वामीजी म्हणाले की, सर्वेक्षण क्रमांक 30, 38, 40 आणि 45 या जमिनी कवळे मठाच्या मालकीच्या असून त्या 1921 साली ‘द पायोनियर क्ले अँड इंडस्ट्रीज वर्क्स लिमिटेड’ या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. “त्या वेळी कंपनीचे संचालक खानापूर येथीलच होते. कालांतराने व्यवस्थापनात बदल झाले आणि बाहेरील व्यक्तींचा समावेश करण्यात आला. पुढे 1960 साली भाडेपट्टा संपल्यानंतर मठाने जमीन परत मागितली होती. मात्र ती न मिळाल्याने न्यायालयीन लढा द्यावा लागला असे सांगून 1970 साली दिवाणी न्यायालयात तडजोड हुकूमनामा झाला. त्यानुसार 31 डिसेंबर 2017 नंतर जमीन मठाकडे परत देणे बंधनकारक होते, असे स्वामीजींनी नमूद केले.
स्वामीजींनी सांगितले की, संबंधित जमिनींचा ताबा 6 फेब्रुवारी 2021 रोजी मठाकडे अधिकृतरीत्या सुपूर्द करण्यात आला असून सध्या त्या जमिनीवर कृषी व फलोत्पादन उपक्रम सुरू आहेत. मात्र न्यायालयीन निर्देश अस्तित्वात असतानाही हुबळी येथील कंदी रविकुमार यांनी 50 -60 लोकांसह सर्वेक्षण क्रमांक 40 आणि 45 मध्ये बेकायदेशीर प्रवेश केला आहे. त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचे आणि ‘भीमसेना अध्यक्ष, कर्नाटक राज्य’ असे फलक लावले आहेत, असा गंभीर आरोप करून ही कृती कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी आहे, असे स्वामीजींनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आली आहे. तरीही कोणतीही कारवाई किंवा एफआयआर नोंदवण्यात आला नसल्याचे सांगून पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल स्वामीजींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, कंपनीकडून काही व्यक्तींना सामान्य मुखत्यारपत्र देऊन राजकीय प्रभावाचा वापर करून सरकारी यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणामुळे देशभरातील कवळे मठाचे भक्त अस्वस्थ झाले असून, न्याय मिळावा यासाठी मोठ्या संख्येने खानापूर येथे येण्याची शक्यता असल्याचे स्वामीजींनी सांगितले. “आम्ही न्यायालय, प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे योग्य कारवाईची अपेक्षा करतो,” असे नमूद करण्याबरोबरच “कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी संयम बाळगावा,” असे आवाहन मठाधीश श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी यांनी शेवटी केले.
Belgaum Varta Belgaum Varta