बसडेपोला युवा समितीचे निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सागरे, दोडेबैल गावच्या ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा गेल्या कित्येक वर्षानंतर येत्या बुधवार दि. १६ पासून मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या लक्ष्मीयात्रेला कर्नाटक राज्यासह महाराष्ट्र, गोवा राज्यातुन भाविक मोठ्या संख्येने येतात.
तेव्हा सागरे, दोडेबैल गावच्या लक्ष्मीयात्रेनिमित्त खानापूर ते सागरे, दोडेबैल गावाला जादा बससेवा सोडुन लक्ष्मीयात्रेला येणाऱ्या भाविकांची सोय करावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीच्यावतीने रविवारी दि. १३ रोजी देण्यात आले.
यावेळी खानापूर बस डेपोच्या व्यवस्थापकांनी निवेदनाचा स्विकार करून सागरे, दोडेबैल गावाला बससेवेची सोय करू असे आश्वासन दिले.
निवेदन देताना खानापूर तालुका युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, तसेच उपाध्यक्ष आर. एम. पाटील, सचिव सजानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, राजू कुंभार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.