
खानापूर : मराठी कागदपत्रांसाठी २७ रोजी होणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवार दिनांक २२ जून २०२२ रोजी नंदगड बाजारपेठ येथे पंचक्रोशीतील हजारो मराठी भाषिकाना मोर्चात सहभागी होण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. यावेळी सीमासत्यागृही म. ए. समितीचे माजी अध्यक्ष पुंडलीक चव्हाण यांच्या उपस्थितीत खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नेतत्वाखाली माजी ता. पं. सदस्य चंद्रकांत देसाई, माजी ता. पं. सदस्य विठ्ठल गुरव, ग्रा. पं. सदस्य रुक्माना झूंजवडकर, ग्रा. पं. सदस्य प्रवीण पाटील, अनंत चन्नप्पा गुरव, वसंत सिमानी सुतार, डी. एम. गुरव, बाबु भुत्तेवाडकर, मधू पाटील, दशरथ पाटील, हणमंत पाटील, रविकांत पाटील, मोहन पाटील, विठ्ठल पाटील, प्रकाश चव्हाण, डी. एम. भोसले, आबासाहेब दळवी, सुहास पाटील, रामचंद्र गावडा, प्रकाश देसाई, सुभाष देसाई, नारायण पाटील इत्यादींनी नंदगड भागाचा दौरा करून २७ जूनच्या महामोर्चाची जागृती केली. यावेळी सीमासत्यागृही पुंडलीक चव्हाण यांनी नंदगड भागातून हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक मोर्च्यात सहभागी होतील असे सांगितले.
दरम्यान, काल मंगळवार दि. २१ रोजी जांबोटी येथे मोर्चात सहभागी होण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने जांबोटी, ओलमनी या भागात माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नेतत्वाखाली जागृती दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर, यशवंत बिर्जे, शिवाजी पाटील, डी. एम. भोसले, आबासाहेब दळवी, जयराम देसाई यांनी सहभाग घेतला होता. जांबोटी भागातील गावोगावी जाऊन मोर्च्यात सहभागी होण्यास सांगण्यात येत होते. या मोर्चाला जांबोटी भागातून पाठींबा मिळत असून माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई यांनी जांबोटी भागातून मोठ्या संख्येने मराठी भाषिक मोर्चात सहभागी होतील असे जाहीर केले. यावेळी माजी जि. पं. सदस्य विलास बेळगावकर, माजी नगरसेवक अनिल पाटील हेही या दौऱ्यात सहभागी होते.
Belgaum Varta Belgaum Varta