खानापूर (प्रतिनिधी) : सध्या तालुक्यात मुसळधार पाऊस चालु आहे. त्यामुळे गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीची तिसरी वर्गखोली जोरदार पावसाने जमीनदोस्त झाली. याआधी शुक्रवारी रात्री एक वर्गखोली कौलारू छतासह जोरदार पावसामुळे जमीनदोस्त झाली तर इतर खोल्या पडण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या 85 वर्षा पूर्वीची गर्लगुंजी मराठी मुलाच्या शाळेची इमारत बांधण्यात आलेल्या कौलारू 11 वर्गखोल्यांपैकी तीन वर्गखोल्या नुकताच झालेल्या पावसामुळे छतासह जमीनदोस्त झाल्या. रात्रीच्यावेळी घटना घडली त्यामुळे यात जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रविण जैन, बीईओ लक्ष्मण यकुंडी, तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटेनेचे अध्यक्ष वाय. एम. पाटील, शाळा मुख्याध्यापिका सौ. एन. जी. देसाई, एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
गर्लगुंजी मराठी मुलांच्या शाळेत 151 विद्यार्थी शिक्षण घेतात तर सहा शिक्षक कार्यरत आहेत.
वर्गखोल्या जमीनदोस्त झाल्याने व इतर वर्गखोल्या धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यास तालुका अधिकार्यांनी विरोध दर्शविला आहे. आता 151 विद्यार्थी पहिली ते सातवी पर्यंतचे कुठे बसणार? आणि शिक्षण कसे घेणार असा सवाल गर्लगुंजी गावच्या शिक्षण प्रेमींतून होत आहे.
तेव्हा संबंधित खात्याने गर्लगुंजी मराठी मुलांच्या शाळेसाठी वर्गखोल्याची त्वरीत मंजुरी मिळवून नवीन इमारत उभी करावी, अशी मागणी केली जात आहे. या शाळेतुन अनेक विद्यार्थी शिकुन गेलेत माजी विद्यार्थ्यांनी माजी शाळा यासाठी लक्ष द्यावे.
नवीन शाळा इमार उभारावी. सध्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी, तहसीलदार प्रविण जैन यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …