खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाच्या अंमलबजावणीसाठी सुचना जारी केली असून 60 दिवसाची मुदत दिली आहे. याला तालुक्यातील विविध गावातून तसेच संघटनांतून विरोध करण्यात येत असून यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रीत येऊन अभ्यासु जानकाराच्या सल्ल्यानुसार यावर चर्चा करून योग्य ती पावले उचलावी, अशी माहिती मणतुर्गा गावचे व माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार यांनी शिवस्मारकात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, खानापूर तालुक्यातील 62 गावाचा इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे 62 गावांना जीवन जगणे मुष्कील होणार आहे.
या इ कोसेन्सेटिव्ह झोनमध्ये मणतुर्गा गावचा समावेश आहे. त्यामुळे मणतुर्गा गावच्या नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. 60 दिवसाच्या आत आपले म्हणणे मांडण्याचा अवधी केंद्र सरकारने दिला आहे. यासाठी तालुक्यातील विविध पक्षाच्यावतीने, राजकीय नेत्यांच्यावतीने सरकारला निवेदन देण्यात येत आहेत.
मात्र या लढ्यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रीत येऊन लढा उभारावा, सरकारला विरोध करावा. तसेच कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन इको सेन्सेटिव्ह झोन विरोध लढा उभारावा, असे मत मांडले.
यावेळी तालुक्यातील 62 गावच्या ग्राम पंचायतींमधून इको सेन्सेटिव्ह झोन विरोध ठराव मांडावा व ते सरकारपुढे सादर करावे, असे सांगण्यात आले.
कै. माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी सुध्दा गावोगावी जाऊन ग्राम पंचायतींमधून ठराव मांडला व तो सरकारला दाखवला यातून त्यांना यश आले होते.
यावेळी पत्रकार परिषदेला आबासाहेब दळवी, प्रल्हाद मादार, शिवाजी पाटील, गजानन गुरव, संजय देवलतकर, ईश्वर बोबाटे आदी मणतुर्गा ग्रामस्थ उपस्थित होते.