तालुका म. ए. समितीचे आरोग्याधिकार्यांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तालुका सरकारी दवाखाना आरोग्याधिकारी श्री. नांद्रे यांना कन्नडसोबत मराठी भाषेत फलक लावण्याबाबत निवेदन देण्यात आले.
10 ऑगस्ट पूर्वी सदर कन्नड फलकावर मराठीतूनही नामफलक लावावा अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील, आबासाहेब दळवी, मर्याप्पा पाटील, शिवाजी पाटील, यशवंतराव बिर्जे, डॉ. एल. एच. पाटील, रमेश देसाई, मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर, शामराव पाटील, अमृत पाटील, शंकर गावडा, डी. एम. भोसले, प्रदीप पाटील यांच्यावतीने आरोग्य कार्यालयाचे प्रथम दर्जाचे लिपिक श्री. कदम यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
याचवेळी जांबोटी क्रॉस ते गोवा क्रॉस रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत त्यासाठी 18 जुलै 2022 रोजी रूमेवाडी क्रॉस येथे म. ए. समितीच्या वतीने रास्तारोको करून प्रशासनाला जाग आणली होती. त्याची दखल घेऊन खानापुरचे तहसीलदार प्रवीण शेट्टी यांनी रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून संबंधित, अधिकार्यांकरवी सदर खड्डे बुजविण्याची जबाबदारी स्वतः तहसीलदारांनी घेतली होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. परंतु तालुक्यातील खानापूर-रामनगर महामार्ग त्याचप्रमाणे प्रत्येक खेड्याला जोडणारे रस्ते गेल्या चार वर्षांत दुरुस्ती केल्याचे भासवत आहेत, परंतु सदरी रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे, अशी माहिती तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील व समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना दिली. त्यावेळी मी तालुक्याचे तहसीलदार म्हणून संबंधित राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना बोलावून आपल्या समवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले व त्या ठिकाणी तुमची प्रत्येक खेड्याच्या रस्त्यांची माहिती आपण सादर करावी म्हणजे त्या बाबतची सविस्तर माहिती संबंधित खात्याचे अधिकारी आपणाला उत्तर देतील व पुढील कार्यवाही करण्यास आपण त्यांना आदेश देऊ असे सांगून तहसीलदारांनी माहिती दिली.