Wednesday , December 10 2025
Breaking News

खानापूर तालुक्याची शान वज्रपोहा धबधबा

Spread the love

खानापूर (विनायक कुंभार) : जवळपास दीडशे फुटावरून फेसाळत कोसळणारा हा सर्वात सुंदर आणि विहंगम असा धबधबा पाहता ही निसर्गाची जादूच आहे. याचा भास होतो. या धबधब्याचे पावसाळ्यातील रूप मात्र, पर्यटकांना पाहता येत नाही ही खेदाची बाब आहे. म्हादई नदीवर असणान्या या धबधब्याला रस्ता नाहीच, शिवाय दाट झाडी, कड्याकपाच्या आणि हिंस्त्र पशु यामुळे त्या ठिकाणी जाणे धोक्याचे आहे. तरीही त्या ठिकाणी मोठी पायपीट करून जाणारे धाडशी पर्यटक धबधब्याबपर्यंत पोहचतात. मार्च महिन्यानंतर या धबधब्याकडे जाणे शक्य होते. जांबोटी येथून चापोली आणि यापुढे जंगल खोऱ्यातून पाच सहा कि. मी. ची पायपीट करून धबधबा गाठावा लागतो, हा प्रवास खडतर आणि तितकाच धोकादायकही आहे. मात्र, येथून धबधब्याच्या खाली जाता येत नाही. केवळ वरून याचे सौंदर्य न्याहाळता येते. त्याऐवजी गवाळी येथून जवळपास १३ कि. मी. ची पायपीट करून धबधब्याच्या खाली जाता येते. मात्र, येथूनही अनेक डोंगरदऱ्या पार कराव्या लागतात. हा ट्रेकिंगचा आनंद काही औरच असतो.

2) सुरल धबधबा

सुरलच्या धबधब्याचे विहंगम दृश्य सुरल या गोवा राज्यात वसलेल्या गावापासून अवघ्या एक कि. मी. अंतरावरील डोंगरमाथ्यावरुन न्याहाळता येते. गावापासून डोंगरमाथ्यावर दगडांचा सपाट सडा आहे. प्रचंड झाडीतून येणारे पांढरेशुभ्र धुके अशा रम्य परिसरात कर्नाटकातून पाण्याचा प्रवाह गोव्याच्या हद्दीतील खोल दरीत झेपावताना दिसतो. जवळपास तीन – चार कि. मी. वरून याचा आनंद घ्यावा लागतो. धबधब्याजवळ जाणे मात्र, अशक्य आहे. कारण धबधब्याच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड दरी आणि ताशीव कडा आहे. गोव्यातून दक्षिण बाजूने दऱ्याखोऱ्यातून पायपीट करत उन्हाळ्यात या धबधब्याकडे जाणे शक्य आहे. त्याच्या पुर्वेस पाहिल्यास मधोमध खोल दरी, बाजूला आकाशाला स्पर्श करण्याची स्पर्धा करणाऱ्या सह्याद्री रांगा, नैसर्गिक ताशीव कडा, असे मनमोहक दृश्य पहावयास मिळते. मात्र, हे दृश्य पाहण्यासाठी धुके ओसरेपर्यंत मन हरवून वाट पहावी लागते.

३) चोर्ला घाटातील लाकडीचा धबधबा

लाककीचा धबधबा हा चोर्ला मार्गे गोव्याला जाताना उजव्या बाजूस लागतो. स्त्यावरून हा दृष्टीस पडतो, याचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पाण्याचा प्रवाह गोवा राज्यात झेपावतो. पर्यटकांची नेहमीच येथे झुंबड उडालेली दिसते. चोर्ला घाटातील डोंगर दऱ्या त्यावर पसरलेली हिरव्यागार रानाची दुलई, त्यावरील दाट धुके त्यामधून दिसणारी गोवा राज्यातील गावे असे दृश्य पर्यटकांच्या नजरेतून ओसंडून वाहते. चोर्ला घाटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावर अनेक ठिकाणी लहान – मोठे धबधवे आहेत. ते अंगावर झेलण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडत असते.

४) हब्बनहट्टी स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्र
हब्बनहट्टी येथील मलप्रभेच्या काठावर वसलेल्या स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्र अलिकडे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पुरातन मंदिर, नदीपात्राचा अखंड प्रवाह, मोठमोठे वृक्ष आणि त्या परिसरातीरील मोठ्या प्रमाणात असलेली रताळ्याची शेती यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी गर्दी करत आहेत. वर्षापर्यटनाचे हे मुख्य केंद्र बनले आहे. त्यामुळे कुटुंबासमवेत त्या ठिकाणी वर्षापर्यटनाची लग्जत चाखण्यासाठी बेळगावसह अनेक ठिकाणाहून पर्यटक गर्दी करीत आहेत.

५) कृष्णापूराचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य
कृष्णापूर अलिकडे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे . या गावाचे जीवनमान आणि खाद्यपदार्थ हा देखील या गावाच्या पर्यटनाचा एक भाग बनला आहे. गावातून जाणार नाले, टेकडीवर वसलेली घरे, माडाच्या बागा, सभोवताली पसरलेल्या दया यामुळे हे गाव जणू वेगळ्या विश्वात असल्याप्रमाने भासते. येथील पिस्त्याची काड एक वेगळी पर्वणी ठरत आहे. म्हादई नदीतील या कोंडीत मोठमोठ्या माशांच्या जलक्रीडा पाहण्यासाठी पर्यटक मुद्दामहून त्या ठिकाणी जातात. एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणारे हे मासे तर एक आश्चर्य आहे. त्यामुळे याठिकाणी श्रावणात पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणात असतो. सद्या त्या ठिकाणी पोहचणे कठीण आहे. साकवांच्या आधारे जावे लागते.

६) चिगुळे येथील काकण आणि छोटे धबधबे
चिगुळे येथील काकण वर्षापर्यटनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. चिगुळेकडे जाताना कणकुंबीपासून जवळच असणारे छोटे धबधबे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्यावरील हिरवळ मोहित करते, पुढे चिगुळे गावात प्रवेश करताच गाव ढगापाठी लपल्याचा भास होतो. गावाच्या पश्चिमेला वसलेले माउली मंदिर येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करून जाते. दगड – धोंड्यातून वाट काढत वाहणारा नाला आणि पुढे जाऊन पन्नास एक फुटावरून कोसळणारा धबधबा दिसतो. धुके ओसरल्यास घाटाचे सौंदर्य न्याहाळता येते.

७) डोंगर माथ्यावरील नवनाथपंथी मठ
खानापूर तालुक्यातील कुंभार्डानजीकचा हंडीभडंगनाथ मठ, डोंगरगावचा दादा मठ, बळेवाडी, किरावळे हे नवनाथपंथी मठदेखील पर्यटकांसाठी मेजवानी ठरले आहेत. या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत आहे. अथांग पसरलेल्या पर्वतरांगा आणि धुक्यात दाटून गेलेला परिसर मनाला अल्हाददायी अनुभव देऊन जातो.

8) चिखले येथील धबधबे
चिखले येथील धबधब्यावर जाणे सोपे आहे. त्याठिकाणी चार चाकी जात असल्याने कौटुंबिक सहलीसाठी यास मोठी पसंती आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *