खानापूर : खानापूर- अनमोड (व्हाया शिरोली हेमाडगा) रस्ता त्वरीत दुरुस्त करावा यासंदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खानापूर यांची भेट घेऊन मणतुर्गा ग्राम पंचायतीच्यावतीने आज निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून बेळगांव ते गोवा (व्हाया रामनगर) हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी दुपदरीकरण नव्यानी करण्यासाठी सुरूवात केलेली होती. परंतु वनविभागाने सदर रस्ता करण्यासाठी आक्षेप वजा बंदी घातलेली आहे. त्यामुळे सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे गोवा राज्यात जाण्यासाठी व गोवा राज्यातून इतर राज्यात येण्यासाठी खानापूर व्हाया शिरोली, हेमाडगा अनमोड या रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर होत आहे. खानापुर ते हेमाडगा हा रस्ता अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो, तसेच या रस्त्याच्या छोट्या मोठ्या रिपेरी, तसेच रस्ता नव्याने करणे हे तुमच्या खात्याची नैतिक जबाबदारी आहे, असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदारामुळे, या रस्त्याची आज चाळण झालेली आहे, याला पूर्णपणे संबंधित अभियंता जबाबदार आहे. वास्तविक सदरी रस्ता हा शेडेगाळी, हारुरी, ढोकेगाळी, मणतुर्गा, यशवंतनगर- मणतुर्गा, तिवोली, तिवोलीवाडा, अशोकनगर, नेरसा, नेरसावाडा, सायाचेहाळ, कोंगळा, पाषटोली, गवाळी तेरेगाळी, शिरोली, मांगिनहाळ, अबनाळी, जामगाव, डोंगरगाव, हेमाडगा, डेगाव, पाली या गावच्या नागरिकांना दळणवळणासाठी आहे. या रस्त्यावरून आपल्या दैनंदिन कामासाठी, नोकरीसाठी, बाजारासाठी व विद्यार्थी शाळेसाठी, कॉलेजसाठी सदरी रस्त्यावरून ये-जा करत असतात. वास्तविक सदर रस्त्यावरून जड वाहंनाना वाहतुकीसाठी बंदी आहे. परंतु वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून या रस्त्यावरून रात्रंदिवस बेफाम वाहतुक चालु आहे, त्यामुळे सदरी रस्त्याची चाळण होऊन रस्त्याच्या मधोमध भले मोठे खड्डे पडलेले आहेत आणि आज या रस्त्यावरून चार चाकी वाहने तर सोडाच, दोन चाकी वाहने चालवण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत आहे, आणि अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, तरी सदर शेडेगाळी ते मणतुर्गा गावापर्यंतच्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी व हा रस्ता येत्या शनिवारी दि. 27 ऑगस्ट 2022 पर्यंत करावा अन्यथा या भागातील नागरिक दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी रस्त्यावर उतरून रस्ता-रोको आंदोलन करतील, असा इशारा मणतुर्गा ग्राम पंचायतीच्यावतीने देण्यात आला.
यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार, राष्ट्रपती पदक प्राप्त शिक्षक आबासाहेब दळवी, समिती नेते यशवंत बिर्जे, समिती नेते प्रकाश चव्हाण, विनायक मुतगेकर, लक्ष्मण कसर्लेकर, मर्याप्पा पाटील, वसंत पाटील, गंगाधर घाडी, गणपती गुरव, विवेक गिरी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta