खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील हत्तरगुंजी डुक्करवाडी, मुडेवाडी रस्ता चिखलाने माखला कारण यंदाच्या मुसळधार पावसाने तालुक्यात थैमान घातले. अनेक रस्त्याचे तीन तेरा वाजले असताना खानापूर डुक्करवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
याबाबत माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने या रस्त्यावर केवळ शेडू मिश्रीत माती टाकून रस्त्याचे काम केले. त्यामुळेच नुकताच झालेल्या पावसाने या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
त्यामुळे या रस्त्यावरून हत्तरगुंजी, डुक्करवाडी, मार्गे खानापूरला जाणाऱ्या वाहनधारकांना तसेच ट्रक अथवा चार चाकी वाहनधारकांना चिखलातून मार्ग काढणे म्हणजे तारेवरची कसरत होत आहे.
अनेक वेळा दुचाकी वाहनधारकांना गाडी चिखलातुन घसरल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. असे प्रकार नेहमीच घडत आहेत. त्यामुळे हत्तरगुंजी, डुक्करवाडी, मुडेवाडी गावच्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारानी या रस्त्याची दुरावस्था पाहुन त्वरीत रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
- प्रतिक्रीया
गेल्या कित्येक दिवसापासून या भागातील नागरिकांना चिखलमय रस्त्यावरून ये-जा करावी लागते आहे. त्यामुळे दुचाकी, तसेच चार चाकी वाहनाना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
– पुंडलिक कुंभार, डुक्करवाडी
Belgaum Varta Belgaum Varta