खानापूर : आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील महिला पदाधिकारीचा अवमान केला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वनमंत्री उमेश कत्ती यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दरम्यान, आज खानापूर भाजपच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्या व्यासपीठावर खानापूर तालुका महिला प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत या देखील उपस्थित होत्या. शोकसभेच्या व्यासपीठावर अरविंद पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता आपल्या उन्मत स्वभावाचे दर्शन करीत डॉ. सोनाली सरनोबत यांना लक्ष करीत व्यासपीठावर त्यांचा अपमान केला.
महिलानी फक्त चूल आणि मूल एवढेच करावे राजकारणात येऊ नये असेही ते म्हणाले.
महिलेने फक्त स्वयंपाक घरात भाकरी, चपाती करण्यापूरतेच डोके चालवावे. राजकारण करू नये असे म्हणत त्यांनी समस्त महिला वर्गाचा अपमान केला.
शोकसभेत भाजप ज्येष्ठ नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्याऐवजी माजी आमदार अरविंद पाटील यांनी आपल्याच पक्षातील महिला पदाधिकारीचा अपमान करण्यात धन्यता मानली.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी अरविंद पाटील यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. ही शोकसभा आहे या व्यासपीठावर राजकीय विषय नको, असेही सांगितले. मात्र माजी आमदारांनी महिलांवर तोंडसुख घेण्यातच धन्यता मांडली.
यापूर्वी देखील खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हातातून माईक हिसकावून घेत त्यांचा देखील अपमान केला होता.
Belgaum Varta Belgaum Varta