खानापूर, : गेल्या कांही महिन्यापासून पोलिसांना चकवा देत दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या तिघांना नंदगड पोलिसांनी रामनगरमधून (ता. जोयडा) स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. मंगळवारी मध्यरात्री रामनगर औद्योगिक वसाहतीत कारवाही केली. त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.
काही दिवसांपासून हावेरीतील हे तिघे भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने स्थानिकांनी पोलिसांना कळविले. संशयित खेडोपाड्यात फिरुन केस गोळा करणे व त्या बदल्यात बारीकसारीक वस्तू देण्याचे काम करायचे. त्यांनी तालुक्यातील गावाबाहेरचीच प्रामुख्याने दुपारी कुलूपबंद घरे त्यांनी फोडली. नंदगड भागात झालेला काही चोऱ्यांची त्यांनी कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यांच्याकडून दीड लाखाहून अधिक रक्कम एक तोळ्याहून अधिक सोने जप्त केले. चोरीतून लंपास केलेल्या साहित्यावर त्यांनी गोळा केलेले केस ठेवल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. पोलीसांनी मुद्देमाल जप्त करुन तिघांना चौकशीसाठी ताब्यात ठेवले आहे. त्यांचे अन्य कुणी साथीदार आहेत का, याचा तपास चालविला आहे. अद्याप गुन्हा नोंद झाला नसून पोलीस विविधांगी तपास करत आहेत. खानापूर पोलिसांच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खानापूर पोलिसही तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चोकशी करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta