Monday , April 20 2026
Breaking News

राष्ट्रपती मुर्मू यांचा विधानसौधमध्ये नागरी सत्कार

Spread the love

 

पद्मश्री पुरस्कार विजेते जोगती मंजम्मा, पदुकोणसह मान्यवरांची उपस्थिती

बंगळूर : राज्याचे शक्ती केंद्र विधानसौध येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा मंगळवारी सायंकाळी नागरी सत्कार करण्यात आला. त्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची निवड करण्यात आली होती.
इस्कॉनचे मधू पंडित दास (समाजसेवा), ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चंद्रशेखर कंबार (साहित्य), बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण, किरण मुझुमदार-शॉ (उद्योग) आणि तृतीयपंथी कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते जोगती मंजम्मा (लोककथा) यांनी मुर्मू यांचा गौरव केला. प्रत्येक मान्यवराने मुर्मू याना चंदनाचा कोरीव हत्ती, एक बिद्री वर्क मोर आणि इतर अनेक कलाकृती प्रदान केल्या.
देशाच्या प्रथम नागरिकाच्या स्वागतासाठी काल रात्री विधानसौध उजळून निघाले होते, मेजवानीचा हॉल पद्म पुरस्कार विजेत्यांसह मान्यवरांनी भरलेला होता. राष्ट्रपती मुर्मू यांचा हा पहिलाच कर्नाटक दौरा आहे, सर्वोच्च पद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिला राज्य दौरा होता.
भाषणाच्या सुरुवातीला द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, माता भुवनेश्वरीच्या मुलांना नमस्कार, मला माझ्या वाटेवर लहान मुलांचे आणि प्रौढांचे प्रेम आणि वातस्ल्य लाभले. मी सदैव तुमच्या सेवेत असेन.
द्रौपदी मुर्मू यांनी राणी चन्नम्मा, राणी अब्बक्का, सांगोळी रायण्णा, पंपा, भीमसेन जोशी, अक्क महादेवी, पुरंदर दास, कनकदास, अल्लमप्रभू, सर एम. विश्वेश्वरय्या, केम्पेगौडा, सी. व्ही. रामण यांच्या योगदानाचे स्मरण केले.
हंपी, ऐहोळे, पट्टदकल्लू आणि बेलूरच्या स्थापत्यकलेचा उल्लेख केला आणि राज्यातून वाहणाऱ्या कावेरी, कृष्णा, तुंगा आणि इतर नद्यांची प्रशंसा केली. त्यांनी शिवपुरा ध्वज आंदोलनासह कर्नाटकच्या स्वातंत्र्यातील योगदानाबद्दल सांगितले.
या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी उपस्थित होते.
निरोप
विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज सकाळी एचएएल विमानतळावर राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी निरोप दिला.
म्हैसूर दसऱ्याच्या मुहूर्तावर धारवाड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचे उद्घाटन आणि धारवाड महानगरपालिकेकडून नागरी सन्मान मिळाला.
त्यांनी बंगळुरूच्या एचएएल येथे क्रायोजेनिक आयसोलेशन युनिटचे उद्घाटन केले आणि आभासी कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या दक्षिणवलय संशोधन केंद्राचे उद्घाटन केले. त्याच प्रसंगी त्यांनी शहरातील नवीन सेंट जोसेफ विद्यापीठाचे उद्घाटनही केले.
२७ सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून नागरी सन्मान मिळालेल्या राष्ट्रपतींसाठी त्याच रात्री राजभवनात खास डिनरचेही आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांत अनेक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर राष्ट्रपती आपला राज्य दौरा आटोपून आज नवी दिल्लीला रवाना झाल्या.
यावेळी अवजड उद्योग मंत्री मुरगेश निराणी, ​​शासनाच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा, लष्कर अधिकारी बसंत रेप्स पॉल, नौदल अधिकारी रुपन बेंबे, राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद, बंगळुरचे पोलीस आयुक्त प्रताप रेड्डी, बंगळुर शहराचे जिल्हाधिकारी श्रीनिवास, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *