खानापूर (तानाजी गोरल) : महाराष्ट्र , कर्नाटक सीमेलगतच्या गावासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या हद्दीत रस्ता करावा, यासाठी खानापूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांना कोल्हापूर येथे भेटून रस्त्यासंदर्भात निवेदन दिले. कणकुंबी, चिगुळे, कोदाळी येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये गंगा भागिरथी यात्रा होणार आहे. या यात्रेत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक तिन्ही राज्यांच्या सीमेलगतच्या गावांचा यात्रेत सहभाग असतो. मागील वर्षी गंगा भागिरथी कणकुंबी येथील तीर्थात अवतरली आहे. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे येत्या फेब्रुवारीत यात्रा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दृष्टीने यात्रेची तयारी व धार्मिक विधी सुरू आहे. याचेच औचित्य साधून खानापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन कर्नाटक, महाराष्ट्र सीमेलगतच्या दुर्गम भागातील गावांचा रस्ता करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले. बाकनूर, बेटगेरी, गोल्याळी, म्हाळुंगे, बैलूर व्हाया गोल्याळी रस्ते तयार करावेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने मंजूर करावा, असे निवेदनात म्हटले. यावेळी निवेदनाचा स्वीकार करून धनंजय महाडिक यांनी आपण जातीने लक्ष घालून कर्नाटक हद्दीपर्यंत यापूर्वी रस्ता करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta