Sunday , September 8 2024
Breaking News

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी आम्ही घडवला इतिहास : श्रीकांत काकतीकर

Spread the love

दुर्गम घनदाट जंगलातील नदी किनाऱ्यावर लसीकरण आणि आरोग्य शिबीर

बेळगाव : आज देशभरात सर्वत्र अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी सर्व जण आपापल्यापरीने आनंदात घालवत होते. अशा या आनंदाच्या दिवशी धो-धो कोसळणाऱ्या पावसात, दुर्गम भागातील घनदाट जंगलातील, खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यातून चालत जात. कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन व त्यांच्या सहकाऱ्यांनी खानापूर तालुक्यातील आमगाव नजीकच्या नदीतीरावर एकशे तीस जणांना कोरोना लस देण्याबरोबरच गावकऱ्यांच्या आरोग्य तपासणी बरोबरच मोफत औषधे वितरीत करून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी अनोख्या पध्दतीने साजरा केला. आजच्या राष्ट्रीय सणा दिवशी घडलेले हे कार्य नक्कीच ऐतिहासिक ठरले आहे.

देशात डिजिटल इंडियाचे नगारे वाजविले जात असताना बेळगाव जिल्ह्यातील, खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेले आमगाव विकासकामांपासून कोसो दूर राहिले आहे. साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या या गावाला जाण्यासाठी तब्बल साडेसहा किलोमीटर खाचखळग्यांनी भरलेला रस्त्यातून गावकऱ्यांना पायपीट करावी लागते. पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा कोसळतात, त्यामुळे नेहमीच विजेचा लपंडाव आणि महिनाभर या भागाला वीज पुरवठा होत नाही.
खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे गावाकडे बस अथवा अन्य प्रवासी वाहने येत नाही. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. पावसाळ्यात आमगावचा इतर भागांशी संपर्क तुटतो. गावकऱ्यांना सातेरी माउलीवर विश्वास ठेवून जीवन जगावे लागते. मतांच्या राजकारणावर डोळा ठेवून कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दुर्गम भागातील जनतेच्या समस्यांची दखल घेण्याची गरज वाटत नाही. आमगावला खासदारांनी कधी पाय लावला नाही. या गावाला भेट देणारे नेते आणि लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन देत गावकऱ्यांची आत्तापर्यंत बोळवण केली आहे. विद्यमान आमदार अंजली निंबाळकर यांनी या भागाला भेट दिली. त्याचबरोबर गावातील समस्यांची माहिती घेतली. गावाकडे येताना लागणाऱ्या बैल नदीवर ब्रिज कम बंधारा बांधून देण्याचे आश्वासन आमदार निंबाळकर यांनी दिले होते. त्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर असल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान दीड वर्ष उलटले तरीही नदीवर पुल झालेला नाही.

यावर्षी जून महिन्यातच नदीला पाणी आले आहे. गावाकडे जाणारा रस्ता नदीला पाणी आल्यामुळे बंद झाला. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. अशावेळी दुर्गम भागात राहणाऱ्या गावकर्‍यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शहरातील नागरिकांना लवकर वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसताना, ग्रामीण दुर्गम भागातील जनतेचे आरोग्य रामभरोसेच ठरले आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी अनेक जण पाय मागे घेतात. मात्र, खानापूर तालुक्यातील कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात कोरोना काळात कणकुंबी परिसरातील तब्बल बत्तीस गावांमध्ये उल्लेखनीय वैद्यकीय सेवा बजावली आहे.

दुर्गम भागातील गावागावात जाऊन गावकर्‍यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर चेतन यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. कोरोना पासून सुरक्षित राहण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग असलेल्या लसीकरणासाठी, शहरी भागातील नागरिकांना वाट बघत बसावी लागत आहे. अशावेळी डॉक्टर चेतन व त्यांच्या सहकाऱ्यांनी युनायटेड सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने दुर्गम भागात लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवत आहेत. आजच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डॉक्टर चेतन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धो-धो पावसात, घनदाट जंगलातील खाच-खळगे आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून जात. आमगाव जवळील बैल नदी नजीक असलेल्या वनखात्याच्या कॅम्पमध्ये, 84 नागरिकांना पहिला तर 52 नागरिकांना कोरोनाची दुसरी लस दिली आहे.

लसीकरणा बरोबरच तब्बल 140 अधिक जणांची कोरोना टेस्ट तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे दिली आहेत. लहान मुलांना लस आणि गावकऱ्यांच्या विविध आजार आणि व्याधी संदर्भात योग्य ते मार्गदर्शन मार्गदर्शन यावेळी डॉ. चेतन व त्यांच्या सहकार्‍यांनी केले. आजच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी घडलेली ही वैद्यकीय सेवा संपूर्ण देशातच एकमेव आणि अनोखी सेवा मानली ठरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

Spread the love    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *