खानापूर (प्रतिनिधी) : भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेल्या स्वातंत्र्यवीर क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या अमर बलिदानाने पावन झालेल्या या भूमीला पुण्यभूमी म्हणून उल्लेख केला जातो. भारत देशामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता म्हणून ग्राम पंचायतीचा उल्लेख आवर्जून केला जातो परंतु या ग्राम पंचायतीचा भ्रष्टाचाराचा कारनामा काही महिन्यांतच जनतेसमोर आला आहे. शनिवार दि. १५ रोजी नंदगडमधील विद्युत दीप खांबांना अचानक पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे गावातील नागरिकांनी ग्राम पंचायत सदस्यांना विचारणा केली असता ग्राम पंचायत नंदगड यांनी आत्तापर्यंत सदर विद्युत बिल न भरल्यामुळे ग्राम पंचायत कार्यालय आणि गावातील विद्युत दीप असलेल्या खांबांना पुरवठा बंद आहे, असे सांगण्यात येत आहे. यामुळे लोकांमध्ये असंतोषाचे सावट पसरलेले आहे त्याचे कारण म्हणजे दिवसाढवळ्या, रात्री होणाऱ्या चोऱ्यांचा सुळसुळाट. त्यामध्ये म्हणजे लहान बालकांचे अपहरणाची धास्ती लोकांना सतावत आहे. तरी तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, लोकप्रतिनिधी यांनी नंदगड ग्राम पंचायतीच्या गैर कारभारामुळे होणारे हाल कमी करण्यासाठी सदर भ्रष्टाचारी अधिकारी, सदस्य, कर्मचारी यांची कसून चौकशी करावी आणि नंदगड गावाच्या विकासाची विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित करावी, अशी मागणी होत आहे. माजी ग्राम पंचायत सदस्य गुंडू रामा हलशिकर यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta