कोल्हापूर (जिमाका) : कळे गावातील इयत्ता 12 मध्ये शिकणार्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात बाल कल्याण समितीला यश आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली.
बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्यांना 6 जुलै रोजी पन्हाळा तालुक्यातील कळे येथील इ. 12 वीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. जिल्हा बाल संरक्षण कक्षातील ज्योती भोई, बाह्य क्षेत्र कार्यकर्ता व चाईल्ड लाईन प्रतिनिधी अस्मिता पवार, भाग्यश्री दळवाई यांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेवून ग्राम बाल संरक्षण समिती अध्यक्ष, सरपंच यांच्या समन्वयातून त्याचबरोबर पोलीस विभागाच्या प्रतिनिधींच्या सहकार्यातून बाल विवाह रोखण्यात आला.
अल्पवयीन बालिका व तिचे आई-वडील यांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे. बाल कल्याण समितीने अल्पवयीन बालिकेस तिच्या आई वडीलांच्या ताब्यात देवून तिचे 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह करणार नसल्याबाबत पालकांकडून बंधपत्र लिहून घेतले आहे.
बाल विवाह रोखण्याकामी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वैशाली बुटाले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते तसेच हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील, ठाणे अमलदार भास्कर सुबराव जाधव व ग्रामपंचायत सदस्य मनोहर शिंदे यांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta