कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी आता खासदारांकडून चाचपणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार शिंदे कळपात सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत दोघांकडूनही जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही.
कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक सध्या दिल्ली दौर्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हमीदवाडामधील सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावर मंडलिक गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातील कार्यकर्त्यांचा सूर खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटात सामील व्हावे, असाच होता. शिंदे गटाशी मनोमिलन करण्यात यावे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
सत्तेच्या बाजूने राहिल्यास निधी मतदारसंघात वळवून आणता येईल आणि विकासकामे करता येतील, अशीही कार्यकर्त्यांनी भूमिका यावेळी मांडली. खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यात आली.
संजय मंडलिक शिंदे गटात गेल्यास शिंदे गट आणि भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते. धनंजय महाडिक हे सध्या भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. त्याशिवाय त्यांना इतरांकडून मोठी साथ मिळू शकते, असा त्यांचा कयास आहे.
कोल्हापूरमधून अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर आणि नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर मंडलिक आणि माने या दोन्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांना साथ देणार असल्याचे स्पष्ट केले होते, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची भूमिका चर्चेची विषय झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta