कोल्हापूर : कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस शिवसैनिक राबले. दोन्ही खासदारांबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड चिड देखील पाहायला मिळत आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांना फसवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यामुळे कोल्हापूरची जनता आणि शिवसैनिक या दोघांना आता माफ करणार नाहीत, 2024 ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून यांनी निर्णय घेतला आहे, त्या लोकसभा निवडणुकीमध्ये कसे निवडून येतात तेच आम्ही पाहणार आहोत? असे देखील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले.
असले पोपट पक्षात घेऊ नका
धैर्यशील मानेंचा इतिहास पाहता त्यांच्याबद्दल मी काही फारसे बोलणार नाही, असले पोपट पक्षात घेऊ नका असे उद्धव ठाकरेंना जिल्हाप्रमुख म्हणून विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. संजय मंडलिक यांनी केलेल्या बंडखोरीने धक्का बसल्याचे संजय पवार म्हणाले. ते आमच्यासोबत होते. मोर्चामध्येही होते. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सोनं आणि बेंटेक्सचा मुद्दा काढला, सगळ्याच गोष्टीमध्ये आमच्याबरोबर होते. सांगून गेले असते, तर वाईट वाटलं नसतं. बाहुबली होऊन पुढे चालतं राहिले असते, तरी आम्ही शिवसैनिकांनी चारी बाजूने त्यांना साथ दिली असती, पण त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे.
तरच आम्ही त्यांना भेटू
बंडखोर खासदार संजय मंडलिक यांनी समजूत शिवसेना पदाधिकार्यांची समजूत काढू असे म्हटले आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांची समजूत काढली, तरच भेटू अन्यथा आम्ही अशा लोकांना आम्ही भेटणार नसल्याचे संजय पवार म्हणाले. जीवाचं रान केल्याचे ते म्हणाले. राजीनामा देऊन लढा म्हणजे शिवसेना काय ते कळेल? तुम्हालाच काही वाटतं नाही, अशी विचारणा करताना संजय पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी घात केला आहे, शिवसैनिकांचा विश्वासघात केल्याचे ते म्हणाले.