
हुपरी : हुपरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर आज ‘देवतात्या’ म्हणून प्रसिध्द असणार्या तातोबा बाबूराव हांडे यांची निवड झाली. एका तृतीयपंथीयाला या पदावर संधी देण्याची हा राज्यातील पहिलीची निवड आहे. ताराराणी आघाडीने त्यांना संधी दिली आहे. आज हुपरी नगरपालिका आवारात या निवडीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते, तर या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. आमदार प्रकाश आवाडे व जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी हांडे यांना संधी दिली आहे. 2017 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 3 मध्ये हांडे यांनी भरलेला अर्ज त्यावेळी निवडणूक अधिकार्यांनी अवैध ठरवला होता. त्यामुळे आजच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष होते. या निवडीबाबत आपण समाधानी असून संपूर्ण राज्यात एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तृतीयपंथीयाला संधी देण्याचे काम ताराराणी आघाडीने केल्याची प्रतिक्रिया जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी यावेळी बोलताना दिली.
हुपरी नगरपालिका ही लोकलढ्यामुळे निर्माण झाली आहे. नगरपालिकेत भाजपा व ताराराणी आघाडी यांच्याकडे प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक करण्याचा अधिकार आहे. ताराराणी आघाडीचे प्रकाश बावचे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. आज नगराध्यक्ष सौ. जयश्री गाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खास सभेत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे एकच जल्लोष करण्यात आला. गरीब, सर्वसामान्य आणि जनतेचा पाठिंबा असणार्या एका तृतीयपंथीयाची निवड करुन संपूर्ण राज्यात प्रथमच आवाडे यांनी तृतीयपंथीयाचा सन्मान केल्याची भावना निर्माण झाली आहे. यावेळी ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्याबरोबरच तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीबाबतचे पत्र पक्षप्रतोद सुरज बेडगे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे दिले होते. त्यानुसार ही निवड झाली. निवडीनंतर तातोबा हांडे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta