कोल्हापूर : मानोली पैकी मुसलमानवाडी (ता. शाहूवाडी) येथे अवैद्यरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तरुणाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रसाद रवींद्र कांबळे (वय २८, रा. डोणोली, ता. शाहूवाडी) असे संशयित बोगस डॉक्टरचे नाव आहे. डॉ. हिरालाल निरंकारी यांच्या फिर्यादीनुसार संशयित कांबळे याच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ चे कलम ३३(२) व ३३ (अ) प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरालाल निरंकारी, आंबा उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील, डॉ. रवींद्र काळे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही धडक कारवाई केली. यामुळे तालुक्यात मानवी जीवाशी बिनदिक्कत खेळणाऱ्या अनेक ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ ठकसेनांची दुकानदारी उजेडात आली आहे.
वैद्यकीय अधिकारी कार्यालय आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलाच्छादित मानोली पैकी मुसलमानवाडी या गावाशी संलग्न धाऊरवाडा ही दुर्गम वस्ती आहे. येथे अधिष्ठीदेवी मंदिराच्या पाठीमागे संशयित तरुण कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक अर्हता नसताना खुलेआम वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरालाल निरंकारी यांनी गोपनीय चौकशी केली असता सदरच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले.
दरम्यान टीएचओ डॉ. निरंकारी यांनी आंबा आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील, डॉ. रवींद्र काळे यांना सोबत घेऊन मुसलमानवाडी पैकी धाऊरवाडा येथील संबंधित अवैध वैद्यकीय व्यवसायाच्या ठिकाणी गुरुवारी रात्री ८.३० वाजता थेट धाड टाकली. यावेळी प्रसाद रवींद्र कांबळे हा तरुण स्थानिक रुग्णांवर वैद्यकीय उपचार करताना आढळून आला. यावेळी त्याच्याकडे कोणतेही अधिकृत वैद्यकीय शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, वैद्यकीय व्यवसायाचा परवाना आदी दस्तऐवज उपलब्ध नव्हते.
अधिक चौकशीत त्याचे अकरावी पर्यंत शिक्षण झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी याच ठिकाणी कार्यरत अन्य नातलग डॉक्टरकडे संशयित तरुण मदतनीस म्हणून कामाला होता. संबंधित डॉक्टरांनी बांबवडे येथे वैद्यकीय व्यवसाय स्थलांतरीत केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून संशयित तरुणाने अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाचे दुकान उघडल्याचे वास्तव समोर आले. यावरून संशयित प्रसाद कांबळे याच्या ‘मुन्नाभाईगिरी’चा पर्दाफाश करून घटनास्थळी आढळून आलेले लहान मोठ्या रुग्णांना उपयोगी औषधे, वजनकाटा, वाफेचे मशीन, रक्तदाब मोजणी यंत्र, टेटॅस्कोप, सिरेंज आदी साहित्य भरारी पथकाने जप्त केले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी संशयित प्रसाद कांबळे याला ताब्यात घेतले. संशयिताविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून कायदेशीर प्रक्रियेनुसार कलम ४१ ची नोटीस बजावून त्याची मुक्तता केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.