कागल (कोल्हापूर) : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळं शिवसेना आणि शिंदे गटात वाद पेटला असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं जात आहे. त्यामुळं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास आणि कामगार अशी महत्वाची खाती सांभाळणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करुन त्यांचं जाहीर आभार मानलेत. मुश्रीफांनी केलेल्या या कौतुकाची जिल्हाभरात जोरदार चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं असून शिवसेना नेमकी कोणाची? यावरती राजकारण येऊन थांबलंय. कागलातील श्रमीक वसाहतीमधील मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आपल्या भाषणात आमदार मुश्रीफ यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत आभार मानलेत.
नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करीत होते. कागलबरोबरच गडहिंग्लज, मुरगुड या शहरांसाठी मी विकासकामांना जेवढा निधी मागितला, तेवढा त्यांनी दिला आहे. शिंदेंनी माझा नेहमीच सन्मान केला असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. मुश्रीफ पुढं म्हणाले, आज जरी ते आमच्या विरोधी सरकारचे मुख्यमंत्री असले तरी कागलला कोट्यवधी रूपयांचा विकास निधी दिला. याबद्दल मला जाहीर आभार मानलेच पाहिजेत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.