Friday , November 22 2024
Breaking News

कोल्हापुरातील 303 फूट उंच राष्ट्रध्वजाला पोलीस दलाकडून सलामी

Spread the love

 

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया : मंत्री चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर (जिमाका) : पर्यटन क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
कोल्हापूर येथील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशात आणि राज्यात आकर्षण ठरलेला 303 फूट उंचावरील राष्ट्रध्वज आज फडकवण्यात आला. यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील व विशेष निमंत्रित ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रीमती मीनाताई गुरव, वसंतराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस विभागाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अंजलीताई पाटील, समरजितसिंह घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रध्वज उभारण्यासाठी मेहनत घेतलेले तंत्रज्ञ, अधिकारी, कर्मचार्‍यांचा मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी प्राणाची आहुती दिली. अनेकांच्या त्याग, बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा शासकीय पातळीवरच न राहता लोकसहभागातून राबविण्यावर भर देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. याचसाठी राष्ट्रध्वज उभारण्यासाठीच्या नियमावलीत बदल करण्यात आले, असे सांगून कोल्हापूर मधील पोलीस उद्यानातील 303 फूट उंचीवरील राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह मेहनत घेतलेल्या चमुचे त्यांनी कौतुक केले.
कोविड परिस्थितीमुळे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल, असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गतः साधनसंपत्ती आहे. विविध संस्थांच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती सारखे अनेक चांगले उपक्रम याठिकाणी होत आहेत. अशा मोहिमांत नागरिकांचा सहभाग वाढवण्याबरोबरच अन्य महत्वपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ’हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पोलीस विभागाच्या वतीने विविध घेण्यात येत आहेत. अमृतमहोत्सवी दौड, सायकल रॅली, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही वेगवेगळ्या कार्यक्रम घेण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रास्ताविकातून दिली.
आभार पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन चारुदत्त जोशी यांनी केले. कार्यक्रमाला एनसीसीचे कॅडेट्स, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *