कोल्हापूर : सीमावादाला हिंसक वळण देणाऱ्या आणि बेताल वक्तव्ये करत सुटलेल्या कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीने कोल्हापुरात एल्गार पुकारला आहे. शनिवारी कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. शनिवारी शाहू महाराजांच्या समाधीजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना देखील निमंत्रित केलं जाणार आहे.
सीमाभागात कन्नडिंगांकडून सुरु असलेल्या हैदोसाविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. चांदा ते बांदा कानडी वरंवट्याविरोधात निषेधाचा सूर उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सीमावासियांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आदी नेते उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील यांनी दोन्ही राज्यांच्या कोल्हापुरात झालेल्या बैठकीवर शंका उपस्थित केली. सतेज पाटील म्हणाले की, दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची या आधी कधीही बैठक झालेली नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यपालांची बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय झालं? याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला समजली पाहिजे. या बैठकीत काय घडलं हे समोर आलं पाहिजे.
ते पुढे म्हणाले, कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. कर्नाटकातील भाजप सरकार जाणार हे समजून आलं आहे. त्यामुळे सीमभागाबद्दल बोलून नागरिकांचा फोकस बदलण्याचा डाव आहे. सीमाभागातील मराठी बांधवांना आधार देण्याची भूमिका या सरकारची नाही. सीमावाद न्यायालयात असताना असं वातावरण करता म्हणजे तुम्हाला राजकारण करायचं आहे हे स्पष्ट होतं आहे. कोल्हापूर नेहमी सीमाभागातील बांधवांना पाठिंबा देत आला आहे. भविष्यकाळात देखील कोल्हापूर सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राहील.
महाराष्ट्राची कळ काढून कर्नाटकात सत्ता आणू पाहत आहेत
हसन मुश्रीफ मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्रकरण कोर्टात असताना अशी वक्तव्ये कर्नाटकच्या कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केली नाहीत. आपली सत्ता येण्यासाठी महाराष्ट्राची कळ काढून कर्नाटकात सत्ता आणू पाहत आहेत. जाणीवपूर्वक भाजपची मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत आहेत. शरद पवार यांनाही बेळगावमध्ये बंदी घातली होती, पण पवार साहेब आदल्याच दिवशी बेळगावमध्ये पोहोचले होते. वेषांतर करून कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. शनिवारी शाहू महाराजांच्या समाधीजवळ कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे सीमाभागातील नेत्यांनाही या ठिकाणी येण्यास विनंती केली जाणार आहे.
तुम्ही हातात वीट घ्याल तर आम्ही हातात दगड घेऊ
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, तोडफोड कशी करायची हे शिवसेनेला शिकवायची गरज नाही. तुम्ही 5 गाड्या फोडल्या तर आम्ही 50 गाड्या फोडू, तुम्ही 10 गाड्या फोडल्या तर 100 गाड्या फोडू. नमस्कार न करता आता चमत्कार दाखवण्याची वेळ आली आहे. तुम्ही हातात वीट घ्याल तर आम्ही हातात दगड घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. तुम्हाला जायचंच नव्हतं, तर घोषणा कशाला केली? चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांनी मराठी माणसाचे खच्चीकरण केल्याचा आरोप पवार यांनी केला.