कोल्हापूर : वडणगे (तालुका करवीर) येथील दिंडे कॉलनीमध्ये राहणारे मधुकर दिनकर कदम (वय 59) व जयश्री मधुकर कदम या दाम्पत्याचा बुधवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शन येऊन या पती-पत्नीचा मृत्यू झाला असावा. अशी शक्यता या दापत्याच्या मुलींनी वर्तवली आहे. दोघांचाही व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कदम दापत्य हे मूळचे शिवाजी पेठेतील आहे. कदम हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी ते वडणगे येथील दिंडे कॉलनीत दोन मुलीसह नवीन घरात राहायला आले होते. या दोघही कदम दाम्पत्याला काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू होता.
पंधरा दिवसांपूर्वी दोघांनी मुक्त सैनिक वसाहत येथील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक औषध घेतले होते. बुधवारी सकाळी दोघांनी औषधी पावडर पाण्यात मिसळून घेतली. त्यानंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले आणि त्यांच्या पत्नी स्वयंपाक करत होत्या. काही वेळातच जयश्री यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर काही वेळात त्या बेशुद्ध पडल्या.
दूध आणण्यासाठी शिवपार्वती चौकातील डेअरीत गेलेले मधुकर कदमही चक्कर येऊन पडल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी कदम दापत्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र खासगी डॉक्टरांनी दोघांनाही सीपीआरमध्ये पाठवण्यास सांगितले. सीपीआर मधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दाम्पत्याला गायत्री (वय १९ )आणि विजया (वय 17) या दोन मुली आहेत. आई-वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे या दोन्ही मुलींना धक्का बसला आहे.