कोल्हापूर : एका तरूणाने जातीय तेढ निर्माण करणारा स्टेटस लावल्याने कोल्हापुरात आज (दि.६) तणावपूर्ण वातावरण बनले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, बुधवारी (दि. ७) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवला. दरम्यान, बुधवारी सकाळी नऊ वाजता हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात जमण्याचे आवाहन बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बंडा साळुंखे यांनी केले आहे. कोल्हापुरात यापुढे कोणाचीही असा स्टेटस लावायची हिम्मत होणार नाही, असा बंद करणार असल्याचा इशारा बंडा साळुंखे यांनी दिला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदचा निर्णय मागे घ्यावा: पोलीस अधीक्षकांचे आवाहन
दरम्यान, आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी आणि त्यानंतर जो बेकायदेशीरपणे मोर्चा काढून कोल्हापुरातील शांतता बिघडविण्याचे प्रयत्न केला. त्या दोघांवरही गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन बुधवारी (दि. ७) हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज (दि.६) केले आहे.