कोल्हापूर : रिपरिप पडणाऱ्या पावसाने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात जोर पकडला. आज दिवसभर पावसाने हजेरी लावली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. पाऊस जेमतेम आठवडाभर टिकला. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जोरदार पावसाची प्रतीक्षा केली जात असताना गेले दोन दिवस पावसाचे दर्शन होत राहिले पण त्याचे प्रमाण कमी होते.
पाणीपातळीत वाढ
आज सर्व भागात चांगला पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक होते. कोल्हापूर शहरात दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
रेड अलर्ट जारी
दरम्यान मुसळधार पावसाची गती पाहता आगामी काही दिवस पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टी अपेक्षित आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या सर्व जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी सावधान गिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एनडीआरएफचे पथक तैनात
गेल्या दोन मोठ्या महापुराच्या अनुभवावरून संभाव्य महापुराची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने नियोजन केले आहे. एनडीआरएफची एक तुकडी दाखल झाली आहे. या पथकाने आज पूरग्रस्त भागांची पाहणी केली या भागातील लोकांना प्रतिनिवारनाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta