माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी स्वीकारला पुरस्कार
– वीज निर्मितीमध्ये कारखान्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव
कागल (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला वीज निर्मितीमधील राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांना देवून गौरविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या को -जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेकडून कारखान्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी कारखान्याच्या मागील तीन हंगामामधील तांत्रिक कार्यक्षमतेचे परीक्षण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, देशभरातून या पुरस्कारसाठी एकूण २८ कारखान्यांची नामांकने आली होती. त्यामधून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यास खाजगी गटातून राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट सहवीज प्रकल्प पुरस्कार मिळाला. आज पुणे येथे कार्यक्रमात देशाचे माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली व को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वीजविक्रीतून ५३ कोटी, ४३ लाख……….
कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ म्हणाले, २०२२-२३ या गळीत हंगामामध्ये कारखान्याने एकूण दहा कोटी, ८१ लाख, ७१ हजार, २७० युनिट वीजनिर्मिती केली. त्यापैकी दोन कोटी, ९१ लाख, ३९ हजार, २७० युनिट वीज कारखान्यासाठी वापरली. महावितरणला सात कोटी, ९० लाख, ३२ हजार युनिट वीज निर्यात केली. त्यापोटी महावितरणकडून ५३ कोटी, ४३ लाख रुपये कारखान्याला मिळाले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमास अध्यक्ष नवीद मुश्रीफ, जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे, मिलिंद पंडे, नामदेव भोसले, बी. ए. पाटील, भुषण हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta