– गोकुळचे संचालक युवराज पाटील यांचे आवाहन
– कागलमध्ये दूध उत्पादकांना दुधाळ म्हैस कर्ज योजनेच्या मंजुरीपत्रांचे वाटप
कागल (प्रतिनिधी) : केडीसीसी बँकेने सुरू केलेल्या दुधाळ म्हैस कर्ज योजनेचा लाभ घेऊन दूध संकलनात वाढ करा, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील यांनी केले. कागलमध्ये दूध उत्पादकांना दुधाळ म्हैस कर्ज योजनेच्या मंजुरीपत्रांच्या वितरण कार्यक्रमात पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते. गोकुळ दूध संघाचे संचालक व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत केडीसीसी बँकेने दुधाळ योजना सुरू केली आहे. त्यासाठी बँकेने ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवलेली आहे. परराज्यातून आणलेल्या दुधाळ म्हशींसाठी एक लाख व दोन लाख अशी तरतूद आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व गोकुळ दूध संघाच्या म्हशीच्या दूध संकलन वाढीमध्ये योगदान द्यावे.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरदृष्टीतून बँकेकडे दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवलेली आहे. शेतकऱ्यांनी परराज्यातून दुधाळ म्हशी खरेदी करून गोकुळ दूध संघाचे म्हशीचे दूध संकलन वाढावे, हा त्यांचा उद्देश आहे. कारण पुण्या -मुंबईसह राज्यभर म्हशीच्या दुधाची मागणी मोठी आहे.
यावेळी सावर्डे खुर्द ता. कागल येथील अंबाबाई महिला सहकारी दूध संस्थेच्या सात सभासदांना मंजुरीपत्रांचे वाटप झाले. या सभासदांना ११ म्हशींसाठी ११ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. संस्थेच्या अध्यक्षा सौ. मंगल मालवेकर, सचिव पांडुरंग कदम, सागर मालवेकर, प्रवीण मालवेकर, महादेव मालवेकर, संतोष मोगणे, शामराव मालवेकर, संजय कदम, पांडुरंग कदम, भारती पसारे, सागर मोगणे, नामदेव मालवेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
तसेच; केडीसीसी बँकेकडून सुरू असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत संदीप माळी -म्हाकवे, सुशांत पाटील- बेलवळे खुर्द, बाजीराव कुदळे -उंदरवाडी, शंकर पाटील -चौंडाळ, अजित हवलदार- लिंगनूर दुमाला, स्वागत पाटील-बानगे, विलास फराकटे -फराकटेवाडी यांना नवीन उद्योग व व्यवसाय निर्मितीसाठी करावयाच्या पतपुरवठ्याची मंजुरीपत्रे देण्यात आली.