कागल पालिकेच्या मूर्ती दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद
कागल (प्रतिनिधी) : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात आज कागल शहर आणि परिसरात घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कागल नगरपालिका प्रशासनाने केलेल्या श्री गणेश मूर्ती दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. तेराशेहून अधिक नागरीकांना मूर्ती आणि निर्माल्य दान करून पर्यावरण रक्षणाला हातभार लावला. दुपारी तीनच्या आत श्री गणेश मूर्ती विसर्जनाचा मुहूर्त असल्याने अनेक नागरिकांनी वेळत मूर्ती विसर्जन करण्यावर भर दिला. मात्र चार वाजल्यानंतर मूर्ती विसर्जनाला वेग आला. पालिकेने शहरातील दहा प्रभागातील १२ ठिकाणी कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती केली होती. शहर आणि उपनगरातील नागरीकांनी आपल्या परिसरातील कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जन करून श्रींच्या मूर्ती पालिकेला दान केल्या. काही नागरीकांनी दुधगंगा नदीपात्रात श्रींच्या मूर्ती विसर्जन करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे दुधगंगेच्या दोन्ही काठावर मोठी गर्दी झाली होती. पालिका आरोग्य विभागाने येथेही मूर्तीदान उपक्रम राबवून अनेक मूर्ती स्विकारल्या. नदीघाटावर कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी घेत आनिशमन दल आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवली होती. तसेच नागरीकांना नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन पालिका कर्मचारी करत होते. पोलिस निरिक्षक गजेंद्र लोहार यांनीही विसर्जनस्थळी भेट देऊन पाहणी केली. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.