कामगारांनी निवेदनातून मांडली कैफियत
कागल (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील “मार्व्हलस मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड” ही कंपनी सुरू करण्यासाठी लवकरच कंपनीच्या व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याचे भाजपाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.
बंद पडलेली कंपनी लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी कंपनीच्या कामगारांनी दोनशे सह्यांचे निवेदन राजे समरजीतसिंह घाटगे यांची भेट घेऊन दिले. त्याप्रसंगी ते कामगारांशी बोलत होते.
निवेदनात म्हटले आहे, गेल्या दीड वर्षांपासून मालकांच्या अंतर्गत वादामुळे कंपनी बंद असल्याने अडीचशे कामगारांवरती उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा,मुलांच्या शिक्षणाचा व कर्जाच्या हप्त्यांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे.त्यामुळे कामगारांची ऐन सणासुदीच्या दिवसांत या तिहेरी संकटातून सुटका होण्यासाठी आपण सत्वर लक्ष घालावे. तसेच कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून लवकरात लवकर कंपनी सुरू करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणीही केली आहे. येत्या कांही दिवसात माहिती घेऊन कंपनी व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करून न्याय मिळवून देऊ असे श्री. घाटगे यांनी यावेळी कामगारांना सांगितले.
यावेळी राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, जयवंत रावण, कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील मोहिते, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सेक्रेटरी महादेव जत्राटे, संघटनेचे सदस्य सुरेश पाटील, उत्तम कोंडेकर, चंद्रकांत कांबळे, विकी मगदूम, तानाजी मालवेकर यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.