कोल्हापूर : एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. त्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकांवर अन्याय झालेला आहे. गेल्या 67 वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे. येथील मराठी भाषिक जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा अद्यापही कायम असून सीमाभागातील मराठी जनता 1 नोव्हेंबर या दिवशी काळादिन पाळून सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करते. या मूक मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक हजारोंच्या संख्येने बेळगाव येथे सहभागी होणार असल्याची माहिती कोल्हापूर लोकसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आणि शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना विजय देवणे म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच मराठी भाषिकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. सीमाभागातील मराठी भाषिक आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहेत. लोकशाही मार्गाने निषेध नोंदविण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांवर बंदी घातली गेली आहे. ती बंदी उठवली पाहिजे. कर्नाटक पोलिसांनी जरी कोल्हापुरातून येणाऱ्या शिवसैनिकांना बेळगावात येण्यास मज्जाव केला तरी देखील गनिमी काव्याने हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी बेळगावात एक नोव्हेंबर काळ्यादिनाच्या फेरीत सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना कोल्हापूर लोकसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आणि शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली.