५ नोव्हेंबर रोजी दिला जाणार हा पहिलाच मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार
कागल (प्रतिनिधी) : मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील “हेमलकसा” सारख्या दुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक गरज म्हणून गेली 50 वर्षे आदिवासी जनतेला आणि वंचित व उपेक्षित घटकांना अखंडित सामाजिक सेवा देणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांना यावर्षीच नव्याने सुरू केलेला प्रतिष्ठेचा “लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज 2023” या पुरस्काराने सन्मानित करीत आहोत, अशी घोषणा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष सौ. नवोदिता घाटगे यानी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. सदरचा पुरस्कार स्वीकारत असल्याचे त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
सहकारातील आदर्श “शाहू उद्योग समूह कागल”चे संस्थापक राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त रयतेचे राजे छ.शाहू महाराज यांना अभिप्रेत असणारे सामाजिक कार्य अविरतपणे व अखंडितपणे करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्याचे यापूर्वी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने डॉ. प्रकाश आमटे यांच्या अलौकिक कर्तृत्वाची प्रशंसा व गौरव म्हणून या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे, असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
साधारणपणे सन 1973 पासून,माडिया आणि गौंड या आदिवासी जनतेला ‘हेमलकसा’ येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून गेली 40 ते 45 वर्ष डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे अहोरात्र सामाजिक सेवा देण्यामध्ये व वन्य प्राण्यांच्या संवर्धनामध्ये व्यस्त आहेत. त्यांचे हे समाजहिताचे कार्य देशाच्या कानोमनी गेले आहे.
लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत, आदिवासींच्यासाठी हॉस्पिटल, निवासी आश्रमशाळा, जखमी वन्य प्रान्याच्या संरक्षणासाठी अनाथालय, ज्येष्ठासाठी उत्तरायण, शेतकऱ्यासाठी आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असून, या भागात बऱ्याच वेळा विज उपलब्ध नसते अशा प्रतिकूल परिस्थितीत विजेशिवाय अनेक आपत्तीकालीन शस्त्रक्रिया करण्याबरोबरच दरवर्षी लाखाहून अधिक लोकांना आरोग्य सेवा पुरवठा व वन्यप्राणी संवर्धनाचे मोठे कार्य ते करीत आहेत.
याचा गौरव म्हणून शासनाने त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, मॅगसेसे पुरस्कार विशेष म्हणजे भारत सरकारने “पद्मश्री” अशा विविध राज्य व राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित केले आहे. विशेष म्हणजे उत्कृष्ट साहित्यिक म्हणून “रणमित्र” आणि “प्रकाश वाटा” त्यांची ही दोन आत्मचरित्र ही प्रकाशित झाली आहेत. व्यवसायाने डॉक्टर असूनही , अतिशय मागासलेल्या आणि दुर्गम भागात निस्वार्थी, निरपेक्ष, निरहेतुक, भावनेने करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल व प्रोत्साहन म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे
दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सायं 5 वाजता कागल येथील शाहू शिक्षण संकुलच्या भव्य पटांगणावर होणाऱ्या “छत्रपती शाहू लोकरंग महोत्सव 2023” मध्ये हजारो उपस्थिताच्या साक्षीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करून महोत्सवाची गोड सांगता होणार आहे.