सर्वपक्षीय तालुकाध्यक्षांचे तहसीलदारांना निवेदन
कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातून जात असलेल्या महामार्गावर धोकादायक स्थितीत उभे राहून हायवे पोलीस वाहनधारकांना नाहक त्रास देत आहेत. हायवे पोलिसांच्या करवी होणारी अडवणूक तात्काळ बंद व्हावी व प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा. यासाठी योग्य त्या सूचना कराव्यात अशा आशयाचे निवेदन तहसीलदार तहसीलदार जितेंद्र इंगळे
यांना सर्वपक्षीय तालुका अध्यक्षांच्यावतीने देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कागलच्या उत्तरेला असलेल्या लक्ष्मी मंदिर शेजारील हायवेवरती मधोमध 10 ते 12 हायवे पोलिस धोकादायक स्थितीत उभे राहतात. कोल्हापूरकडे जाणाऱ्या बहूतांशी वाहनांना हायवेवरती अडवून कागदपत्रांची तपासणी करण्याच्या इराद्याने अडवले जाते. यामध्ये दुचाकी व चारचाकी
या वाहनांनाचा समावेश असतो. या ठिकाण तीव्र चढती असलेने अडविलेल्या वाहनाच्या मागील वाहनांना सदरचा टेक पास करणे मुश्किल होते. परिणामी अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेषत: कर्नाटक राज्यातून येणाऱ्या बहूतांशी गाड्या आडवून
पर्यटकांना नाहक पणाने त्रास दिला जातो.
काही दिवसापूर्वी समृध्दी महामार्गावरती हायवे पोलिसांच्या चुकीने 13 जणांचा बळी गेला त्या घटनेची पुनरावृती होवू नये. याकरीता, हायवे पोलिसांच्या करवी होणारी अडवणूक तात्काळ बंद व्हावी व प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा. याकरीता आपले स्तरावरून सदर विभागास गांभिर्याची समज देणेत यावी.
यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसचे अध्यक्ष शिवानंद माळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, कागल शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट), काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते. .