कोल्हापूर : राज्यामध्ये अवघ्या चर्चेचा विषय झालेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी जवळपास निश्चित केल्यानंतर आता भाजपने शांतीत क्रांती करत आपला पत्ता उघडला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांसमोर निभाव लागणार नाही, याची चर्चा रंगली असताना आता थेट भाजपकडून भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याच नावाचा नावाचा प्रस्ताव समोर आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून समरजितसिंह घाटगे यांना मागील दाराने उमेदवारीसाठी तयारी करण्यास सांगण्यात आले होते, अशी चर्चा आहे.
मात्र घाटगे यांचे नाव कोल्हापूर लोकसभेसाठी चर्चेत आल्याने कोल्हापूरमध्ये कांटे की टक्कर होणार हे मात्र निश्चित आहे. समरजितसिंह घाटगे यांची जमेची बाजू पाहिल्यास कागल विधानसभा मतदारसंघ आमदार होण्याच्या इराद्याने पिंजून काढला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. घाटगे यांना मुश्रीफांविरोधात सातत्याने बळ देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दुसरीकडे संजय मंडलिक यांनी मीच महायुतीचा उमेदवार असा दवा केला असला, तरी अंतर्गत सर्वे हे पूर्णतः शिंदे गटाचे खासदार असलेल्या संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या विरोधात असल्याने भाजपकडून कुठल्याही प्रकारची धोका न पत्करता या दोन्ही उमेदवारांचा पत्ता कट करून तिथं पर्याय उमेदवारी देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.
घाटगे आणि मुश्रीफांमध्ये असलेला छत्तीसचा आकडा असल्याने राजकीय विस्तव सुद्धा जात नाही, अशी स्थिती आहे. दोघे एकमेकांविरोधात नेहमीच ठाकले आहेत. मुश्रीफ ईडीच्या रडारवर आल्यानंतर त्यांनी सातत्याने घाटगे यांच्याकडे बोट केलं आहे. त्यामुळे घाटगे हे जर लोकसभेसाठी उमेदवार झाल्यास मुश्रीफ आगामी विधानसभेसाठी आपला मार्ग सुकर करून घाटगे यांना पूर्ण मदत करणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल. दुसरीकडे संजय मंडलिकांना उमेदवारी नाकारली गेली, तर ते किती ताकतीने त्यांना मदत करणार? यावर सुद्धा बरीच गणित अवलंबून असणार आहेत.